पुण्याच्या अधिकाऱ्यावर भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:16 PM2020-05-27T13:16:35+5:302020-05-27T13:19:11+5:30
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी संबंधित तरुणाकडे सध्याचे पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर पैशाची मागणी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचवड : काही दिवसांपूर्वी वाई शहरात गोळीबार करून टोळीयुद्धाच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या भुईंज येथील संशयित तरुणावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी संबंधित तरुणाकडे सध्याचे पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर पैशाची मागणी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबारात सहभाग असलेल्या संशयित तरुणास अटक न करण्यासाठी हुंबरे यांनी तरुणाकडे पैशाची मागणी केली होती. मागणी करण्यात आलेल्या पैशांची देवाण-घेवाण भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हुंबरे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा व पुणे जिल्ह्यांबरोबरच राज्य पोलिस दलात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हुंबरे सध्या पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असून, मागील तीन महिन्यांपासून ते रजेवर आहेत.
दरम्यान सक्तीच्या रजेवर असताना देखील वर्दी परिधान करून त्यांनी पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी करून त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला भुर्इंज पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे.