लिफ्टचा बहाणा करून मैत्रिणीच्या पतीकडून बलात्कार, तरुणास अटक; साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: March 4, 2023 04:20 PM2023-03-04T16:20:32+5:302023-03-04T16:21:11+5:30
आपलीच इज्जत जाईल या भीतीने तिने महिनाभर हा प्रकार कोणालाच सांगितला नाही
सातारा : लिफ्टचा बहाणा करून दुचाकीवरून नदीकाठी शेतात नेऊन जबरदस्तीने तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या पतीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी एका तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी साताऱ्यातील राहणारी असून, ती १९ वर्षांची आहे. तिच्या कुटुंबीयांनी दुसरीकडे भाड्याने खोली घेतली होती. १२ फेब्रुवारी रोजी शिफ्टिंग सुरू होतं. तेव्हा रात्री पावणेबारा वाजता ती तरुणी भाड्याने घेतलेल्या नव्या घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिच्या मैत्रिणीच्या पतीने ‘तुला लिफ्ट देतो, घरी सोडतो,’ असे पीडित तरुणीला सांगितले. त्यामुळे तरुणी त्याच्यासोबत दुचाकीवरून घरी जाण्यास तयार झाली.
त्या तरूणाने पीडित तरुणीला दुचाकीवर बसवून दुचाकी घरी नेण्याऐवजी वर्ये, ता. सातारा गावाजवळ असलेल्या वेण्णा नदीकडे जबरदस्तीने नेली. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. नदीकाठी असलेल्या एका शेतात नेऊन पीडित तरुणीवर त्याने बलात्कार केला.
‘तुझे वडील हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट आहेत, हे लक्षात ठेव. कोणाला सांगितलेस तर माझ्याशी गाठ आहे,’ अशी पीडित तरुणीला त्याने धमकी दिली. त्यानंतर रात्री दीड वाजता पीडित तरुणीला त्याने तिच्या घराजवळ आणून सोडले. या प्रकारानंतर पीडित तरुणी भयभीत झाली होती. आपण हा प्रकार जर कोणाला सांगितला तर आपलीच इज्जत जाईल, या भीतीने तिने महिनाभर हा प्रकार कोणालाच सांगितला नाही.
परंतु तिच्यावर झालेल्या या अन्यायाने तिला स्वस्त बसू दिले नाही. शुक्रवार, दि. ३ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. नराधम आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा पती आहे. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित नराधम तरुणाला अटक केली आहे.
विश्वास कोणावर ठेवायचा...
दोघे एकाच पेठेत राहत असल्यामुळे तसेच मैत्रिणीचा पती असल्यामुळे पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. आपल्याला तो घरी सुखरूप सोडेल, असे तिला वाटले; पण गाडीचा वेग वाढवून गाडी त्याने भलतीकडेच नेली आणि ज्याची भीती पीडितेला होती, तेच झालं. आपल्या ओळखीतलेच अब्रूची लक्तरे काढत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा, असा संतप्त सवाल सातारकरांमधून विचारला जातोय.