Satara: शाळेत सोडतो म्हणून घेवून गेला अन् सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:03 PM2024-10-02T14:03:14+5:302024-10-02T14:05:07+5:30
डॉक्टरांनी विश्वासात घेऊन चिमुकलीला विचारले अन् समोर आला धक्कादायक प्रकार
मायणी : खटाव तालुक्यातील एका गावातील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वडूज पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीची आई २० सप्टेंबर रोजी मुलीला शाळेत सोडण्यासाठी उभी राहिली होती. त्यावेळी ओळखीचा एक व्यक्ती पाठीमागून गाडीवरून आला. त्यावेळी तो चिमुकलीच्या आईला म्हणाला, मी मुलीला शाळेत सोडतो असे म्हणून तिला गाडीवर बसवून घेऊन गेला. साडेअकराच्या सुमारास आईने शाळेत मुलगी आली का याची चौकशी केली असता शिक्षकांनी मुलगी आल्याचे सांगितले.
तद्नंतर शाळा सुटल्यानंतर चिमुकली घरी जात असताना हात पाय दुखतात मला उचलून घे, असे म्हटल्यानंतर आईने तिला उचलून घेतले व घरी आल्यानंतर घरातीलच असलेल्या औषध गोळ्या दिल्या मात्र दुसऱ्या दिवशीही अंग पाय दुखतंय अशी चिमुकली म्हणू लागली. तिला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी विश्वासात घेऊन चिमुकलीला विचारले.
त्यावेळी तिने त्या व्यक्तीने मला शाळेत जाताना ओढ्याकडेला शेतात नेऊन गैरप्रकार केला. तसेच मला मारहाण केली व शाळेत पाठवले असा घडलेला प्रकार तिने सांगितला. या प्रकारानंतर चिमुकलीच्या आईने व नातेवाइकांनी वडूज पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक वाघमारे व हवालदार नानासो कारंडे हे अधिक तपास करत आहेत.