कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘रक्तलोचन घुबड’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 01:50 PM2022-10-24T13:50:39+5:302022-10-24T13:51:10+5:30
दुर्मीळ होत चाललेले हे रक्तलोचन घुबड कोयना अभयारण्यात आढळल्याने येथील प्राणीमित्र तसेच पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला
कोयनानगर : जैवविविधतेने संपन्न कोयना अभयारण्यातील जंगलात रक्तलोचन हे दुर्मीळ घुबड आढळून आले. कोयनेतील स्थानिक पक्षीमित्र आणि डिस्कव्हर कोयनाचे सदस्य निखिल मोहिते यांनी हे घुबड पाहिले. त्यानंतर याबाबतची माहिती वन्यजीव विभागाला देण्यात आली. वन्यजीव विभागाने पाहणी करून या घुबडाची नोंद घेतली.
कोयनेतील निखिल मोहिते यांना रस्त्यालगत असणाऱ्या झाडावर घुबडाचे दर्शन झाले. प्रथमदर्शनी ते ‘मत्स्यघुबड’ असावे, असा त्यांनी अंदाज बांधला. सायंकाळ असल्यामुळे त्यांना स्पष्टपणे ओळखता येत नव्हते. त्यातच त्यांनी गाडीच्या प्रकाशात मोबाइलने घुबडाचे फोटो काढून पाहिले. त्यावेळी ते दुर्मीळ ‘रक्तलोचन घुबड’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती डिस्कव्हर कोयना टीमचे पक्षीमित्र संग्राम कांबळे यांना व वन विभागाला दिली. संग्राम यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी पोहोचून कॅमेऱ्यामध्ये घुबडाचे फोटो घेतले. यापूर्वी कोयना अभयारण्यामध्ये कोणीही या घुबडाचा अधिवास असल्याची नोंद केली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोयना अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार व चांदोली अभयारण्याचे संदीप जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घुबडाची नोंद करण्यात आली.
निखिल मोहिते व संग्राम कांबळे यांनी सांगितले की, रक्तलोचन घुबड ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या अंगावर वरील बाजूस पांढरे व तांबूस चट्टे असतात. खालील बाजू पांढुरकी असून, त्यावर गडद तपकिरी रेषा तसेच लालसर-तपकिरी चट्टे व पट्टे असतात. फिक्कट चपट्या चेहऱ्यावर काळ्या वर्तुळाकार रेषा व डोळे गडद असतात. त्याचा अधिवास खुली जंगले, शेती प्रदेश तसेच ग्रामीण भागातील वनराया येथे असतो. या घुबडांची संख्या स्थिर आहे. दिवसा विश्रांती घेऊन रात्री शिकार करतो. खारी, छोटे सरपटणारे प्राणी, उंदीर, सरडे, खेकडे, कीटक हे त्याचे मुख्य खाद्य आहे. दुर्मीळ होत चाललेले हे रक्तलोचन घुबड कोयना अभयारण्यात आढळल्याने येथील प्राणीमित्र तसेच पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला.
विविध घुबडांची यापूर्वी नोंद
कोयना अभयारण्यात यापूर्वी डिस्कव्हर कोयना टीमने पंधरापेक्षा जास्त प्रकारच्या घुबडांची आणि दुर्मीळ पक्ष्यांची, फुलपाखरांची नोंद केली आहे. अधिवासानुसार घुबडांचे प्रकार बदलतात. पश्चिम घाटात पिंगट वन घुबड, मत्सघुबड, महाकौशिक, बहिरी घुबड, पट्टेरी रानपिंगळा, हुमा घुबड अशी विविध प्रकारची घुबड पाहायला मिळतात. शहराजवळ गव्हाणी घुबड, पिंगळा वास्तव्यास असतात, असे निखिल मोहिते व संग्राम कांबळे यांनी सांगितले.