Satara: कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:41 PM2024-07-05T12:41:20+5:302024-07-05T12:41:43+5:30

कोयनानगर : कोयना अभयारण्यात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा ...

Rare Brown Palm Civet found in Koyna Sanctuary | Satara: कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

Satara: कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

कोयनानगर : कोयना अभयारण्यात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला. आजवर या संस्थेने अनेक दुर्मीळ वन्यजीव, घुबड, फुलपाखरांचा शोध लावला असून, त्यांच्या संशोधनाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

कोयना अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. यामध्ये अनेक दुर्मीळ प्राणी, पक्षी, वनस्पती वनौषधी प्रजाती असून त्याचा संशोधनातून उलगडा होत आहे. हा निसर्ग अभ्यासकांसाठी खजिना आहे. कोयना विभागात पर्यटनासोबत वन्यजीवांचे फोटोग्राफी, संशोधन, जैवविविधतेचा अभ्यास करणारी ‘डिस्कवर कोयना’ या संस्थेच्या सदस्यांना फोटोग्राफी करताना एक दुर्मीळ प्राणी कॅमेरात कैद झाला. संस्थेच्या सदस्यांनी कॅमेरामधील प्राण्याचे बारकाईने निरीक्षण केले असता. निसर्ग अभ्यास व अनुभवावरून हा पश्चिम घाटातच आढणारा ‘तपकिरी पाम सिवेट’ असल्याचे सिद्ध झाले.

आजवर गोव्यातील कॅसलरॉक ते कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील उंच पर्जन्यवनात हा प्राणी आढळतो, अशा लँडस्केपमध्ये टिकून राहण्याची त्याची क्षमता ही फळझाडांच्या प्रजातींच्या विविधतेवर अवलंबून असते. तपकिरी पाम सिवेट एकाकी व निशाचर असणारा प्राणी आहे. तो दिवसा झाडांच्या डोली, पोकळ्या, वेलीचे जाळे, शेकरूचे घरटे आणि फांद्यांच्या काट्यामध्ये आराम करत असतो. काही वेळा रात्री उघड्या फांद्यांत विश्रांती घेत असतो. प्रामुख्याने हा झाडाची फळे खाऊन जगणारा प्राणी आहे.

हॉर्नबिल, मोठे कबुतर आदी पक्ष्याप्रमाणे फळाच्या बिया खाऊन त्याचे विष्ठेतून बीज उगवले जाते. त्याचप्रमाणे हा प्राणी निसर्ग संवर्धन वृक्षारोपणाचे महत्त्वपूर्ण कार्य करत असतो. काही ठिकाणी याचा अधिवास नष्ट झाल्यामुळे अथवा शिकारीमुळे जैवविविधतेवर परिणाम होतो. ‘तपकिरी पाम सिवेट’ हा विखुरणारा प्राणी असल्याने जैवविविधता संवर्धनासाठी निसर्गातील एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो.

कोयना अभयारण्यामध्ये असणाऱ्या दुर्मीळ घटकावर संशोधन, अभ्यास होणे अपेक्षित आहे. यासाठी स्थानिक व्यक्ती व संस्थांना यामध्ये सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे मत डिस्कवर कोयना संस्थाचे महेश शेलार, संग्राम कांबळे व सागर जाधव यांनी व्यक्त केले.

सह्याद्री प्रकल्पामध्ये पुणे, मुंबईसह दूरवरचे अभ्यासक संशोधक विद्यार्थी व संस्था वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन व अभ्यासासाठी येत असतात, त्यांना या संशोधनात खरी मदत स्थानिक नागरिक व निसर्ग अभ्यासक संस्था करत असतात. अशा स्थानिक अभ्यासक व निसर्ग संस्थांना वन्यजीव विभागाने मार्गदर्शन करून त्यांच्यामार्फत नवनवीन संशोधन होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. -महेश शेलार, अभ्यासक, नवजा

Web Title: Rare Brown Palm Civet found in Koyna Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.