‘सह्याद्री’त दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ची नोंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:52+5:302021-05-27T04:40:52+5:30

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रथमच दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ची नोंद झाली आहे. प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष ...

Rare 'Griffon Vulture' recorded in 'Sahyadri'! | ‘सह्याद्री’त दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ची नोंद!

‘सह्याद्री’त दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ची नोंद!

Next

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रथमच दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ची नोंद झाली आहे. प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी आकाशात घिरट्या मारताना दिसला. इतर पक्ष्यांपेक्षा तो वेगळा वाटल्यामुळे वनरक्षक चाळके यांनी बारकाईने त्याच्या हालचालींकडे पाहिले. तसेच त्याची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली. हा पक्षी दुर्मीळ असावा, अशी शक्यता असल्यामुळे वनरक्षक चाळके यांनी अधिक अभ्यासासाठी ही छायाचित्रे पक्षितज्ज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना पाठविली. रोहन भाटे यांनी छायाचित्रे तपासली असता संबंधित पक्षी दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ असल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यत्वे हा पक्षी तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया, दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात आढळतो. हा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत असतो. ही एक दुर्मीळ गिधाडाची प्रजाती आहे. त्याच्या डोक्यावरील पंख पांढरे शुभ्र असतात. पाठीवरचे पंख अत्यंत रुंद व तांबूस रंगाचे असतात, तर शेपटीचे पंख हे गडद तपकिरी असतात. पर्वतांमध्ये हा पक्षी प्रजनन करतो.

वनरक्षक संतोष चाळके यांनी दक्षपणे या पक्ष्याची नोंद केली. त्याबद्दल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी त्यांचा सत्कार केला.

- चौकट

‘ग्रिफॉन गिधाड’ची वैशिष्ट्ये

१) या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘ग्रिफॉन वलचर‘ आणि शास्त्रीय नाव ‘गीप्स फुल्वस’ असे आहे.

२) हा एक अत्यंत मोठा पक्षी असून, त्याची उंची साधारणपणे १२५ सें.मी. असते.

३) दोन पंखांची लांबी साधारण ८ ते ९ फुटापर्यंत असते.

४) नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन ८ ते १० किलो नोंदवले गेले आहे.

५) इतर गिधाडांप्रमाणेच हा ‘स्केवेंजर’ म्हणजेच कुजलेले व सडलेले मांस खाणारा गिधाड आहे.

- कोट

सह्याद्रीत आढळलेल्या ‘ग्रिफॉन गिधाड’च्या उजव्या पंखावर नारंगी टॅग आहे. शास्त्रीय व स्थलांतराच्या अभ्यासासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने ‘टॅग’ लाऊन हे गिधाड सोडलेले आहे. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व आंतरराष्ट्रीय संस्थांना संपर्क करून त्यांना या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे.

- रोहन भाटे, पक्षितज्ज्ञ

मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड

फोटो : २६केआरडी०३

कॅप्शन : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ आकाशात घिरट्या घालताना आढळून आले. वनरक्षक संतोष चाळके यांनी त्याला कॅमेराबद्ध केले आहे.

Web Title: Rare 'Griffon Vulture' recorded in 'Sahyadri'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.