रिसालदार तलावातील दुर्मीळ शिलालेखाने इतिहासाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:43 AM2018-04-22T00:43:52+5:302018-04-22T00:43:52+5:30
सातारा : जागतिक वारसा दिनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात शनिवारी सकाळी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन केले होते.
सातारा : जागतिक वारसा दिनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात शनिवारी सकाळी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन केले होते. या दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रिसालदार तलावात छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या नावाचा उल्लेख असणारा देवनागरी शिलालेख प्रकाशात आणला. तो श्री शके १५८ या राज्याभिषेक वर्षातील आहे. त्यावर तत्कालीन घोडदळाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलाव बांधल्याचा उल्लेख आढळतो.
जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्थेने जागतिक वारसा दिनाच्या अनुषंगाने शनिवारी हेरिटेज वॉक आयोजित केला होता. या वारसा सहलीचे नियोजन कला व वाणिज्य महाविद्यालयासह जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्थेने केले होते. यंदाच्या पाचव्या हेरिटेज वॉकमध्ये साताºयाच्या महत्त्वाच्या काही स्थळांचा समावेश केला.
राजवाड्यासमोरील गोल बागेतून सुरूवात झाली. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी शहरासमोरील वारसा जपणुकीच्या समस्या आणि नागरिकांचे प्रयत्न यांचे महत्त्व विशद केले.
हत्तीखाना, पंचपाळी हौद, जुनी नगरपालिका, छत्रीहौद, कमानी हौद या क्रमाने घेत ब्रिटिश दफनभूमीजवळ पोहोचली. येथे असलेल्या ब्रिटिशकालीन कबरी प्रत्यक्ष पाहून त्यांचा इतिहास जाणून घेतला. येथून पुढे चिनी कैद्यांनी बांधलेल्या तुरुंगाची माहिती घेऊन पोलीस मुख्यालयाजवळ पोहोचली.
पोलीस उपअधीक्षक (गृह) राजलक्ष्मी शिवणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रतिसरकार स्वातंत्र्य युद्धाविषयी माहिती घेऊन गुरुवार परज याठिकाणी हेरिटेज वॉकची सांगता झाली. याप्रसंगी कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. बी. आर. सातपुते यांनी आभार मानले. प्रा. गौतम काटकर, जिज्ञासाचे नीलेश पंडित, धैर्यशील पवार, शीतल दीक्षित यांनी विशेष परिश्रम घेतले.
साताºयाच्या नियोजनबद्ध विकासाचा उलगडा
त्यानंतर १९१३ मध्ये बांधलेले पोलीस मुख्यालयाची ब्रिटिश स्थापत्य शैलीतील वास्तूची माहिती घेऊन हेरिटेज वॉक दौलतखान रिसालदार यांच्या तलावाजवळ पोहोचला. तेथे प्रतापसिंह महाराज कालीन एका दुर्लक्षित शिलालेखाबद्दल माहिती देण्यात आली.
रिसालदाराच्या नावे असणारा आणखी एका शिलालेखाचे वाचन ही करण्यात आले. छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज छत्रपती शहाजी महाराज यांच्या काळापासून सातारा नियोजनबद्ध पद्धतीने कसा विकसित झाला. याची माहिती ‘जिज्ञासा’चे अध्यक्ष विक्रांत मंडपे यांनी दिली.
‘परज’ या शब्दाचा मराठी अर्थ तलवारीच्या मुठीचा एक भाग असा होतो. परंतु जागेसाठी हा शब्द का वापरला असावा याचा जिज्ञासाने शोध घेतला. हा शब्द फारसीतून आला असावा, या दृष्टीने पाहिले असता फारसी शब्द कोषानुसार या शब्दाचा एक अर्थ चार बाजूने बंदिस्त असलेला कारागृह असा आहे. व्युत्पत्ती कोषही याला दुजोरा देतो. मराठे कालीन साधनात साताºयात असे दोन परज अस्तित्वात होते, असा उल्लेख आहे. यातील एक सचिवाच्या वाड्यानजीक तर दुसरा थोरला परज गुरुवार पेठेत होता.
- योगेश चौकवाले
सातारा पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रिसालदार तलावातील दुर्मीळ शिलालेखाचे वाचन केले.