सातारा जिल्ह्यातील कोरोनावाढीचा दर अचानक घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:11+5:302021-07-14T04:44:11+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून अचानक पणे कमी होऊ लागलेली आहे. रविवारी ९ हजार ८४२ ...
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून अचानक पणे कमी होऊ लागलेली आहे. रविवारी ९ हजार ८४२ चाचण्यांमधून ५७६ नवे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. कोरोना वाढीचा दर अचानकपणे ६.०७ टक्क्यांच्यावर खाली आला आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रविवारी नेहमीच कमी चाचण्या होत असतात. त्यामुळे सोमवारी येणार अहवालात रुग्णांची संख्या कमी दिसते. मात्र मागच्या रविवारी तब्बल ९ हजार ८४२ इतक्या चाचण्या झाल्या. त्यातून ५७६ रुग्ण बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्यादेखील कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. मे महिन्यामध्ये जिल्ह्यात एका दिवसामध्ये २ हजार ६०० इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण आढळले होते. दर दिवसाला मृत्यूंची संख्या देखील ४० वर जाऊन पोचली होती. जून महिन्यात रुग्ण संख्या थोडी कमी होऊन एक हजारांवर स्थिरावली होती.
जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात देखील रुग्ण संख्या कमी होत नव्हती. आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळालेला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील तणाव देखील थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ३ हजार ७८८ इतका झालेला आहे. मेआणि जून महिन्यामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आता मात्र कोरोनाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. कर्हाड तालुक्यातील रुग्ण संख्या सातत्याने वाढत होती. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान ही रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आता कऱ्हाड तालुक्यात देखील रुग्ण संख्या कमी होताना दिसते आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातारा तालुका रूग्ण संख्येत आघाडीवर होता, आता मात्र सातारा तालुक्यात देखील रुग्ण संख्या घडताना दिसते आहे. रविवारी कऱ्हाड तालुक्यात १४७ तर सातारा तालुक्यात १४२ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ९१७ लोकांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. मृत्यूच्या संख्येत देखील सातारा तालुका सर्वात पुढे होता. आता या तालुक्यातील मृत्यूची संख्या कमी झाली. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या सोमवारी संध्याकाळपर्यंत १ हजार २४६ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ११ लाख ८९ हजार ५२० तपासण्या करण्यात आल्या असून २ लाख ३ हजार ७८८ रुग्ण आढळले आहेत. तर ९ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
१६.४९ वरुन ६ टक्क्यांवर घसरण
मागील आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा दर १६.४९ टक्क्यांवर गेला होता. आठवडाभर रुग्णवाढ कायम राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू केले. रविवारी मात्र रुग्ण वाढीचा दर ६.७ टक्क्यांवर खाली घसरल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारपर्यंत जर रुग्णसंख्या वाढीचा दर तेवढाच राहिला किंवा आणखी घटला तर जिल्ह्यातील चौथ्या टप्प्यात लागू असलेले निर्बंध हटवले जाऊ शकतात.