औंधमध्ये रथोत्सवास प्रारंभ, उदे गं अंबे उदेचा गजर : महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:35 PM2018-01-03T17:35:27+5:302018-01-03T17:40:44+5:30
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उदे गं अंबे उदेच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हजारो भाविक औंधनगरीत दाखल झाले आहेत.
औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उदे गं अंबे उदेच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हजारो भाविक औंधनगरीत दाखल झाले आहेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिरामध्ये देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात आणण्यात आली.
यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांंच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली.
पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृदांच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी अजित पवार यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा रथ ग्रामप्रदक्षिणा करणार आहे.