कागदी घोडे नाचविण्यापेक्षा सरसकट पंचनामे करा--जयकुमार गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 08:29 PM2019-11-04T20:29:29+5:302019-11-04T20:34:03+5:30
पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचं कंबरडं मोडलंय. जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
म्हसवड : ह्यमाण आणि खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवायचे बंद करून दोन्ही तालुक्यांत सरसकट पंचनामे करावेत, अशी सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी केली.
दहिवडीतील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत आमदार गोरेंनी ही सूचना केली. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, कायम दुष्काळाच्या झळा सोसणा-या माण आणि खटाव तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचं कंबरडं मोडलंय. जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.
कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता वेळ न दवडता नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. पंचनामा करणाºया एजन्सीज व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यांचा मेळही बसणार नाही. सर्व ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश द्या. प्रत्येक शेतकºयाच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि तहसीलदारांनी द्यावेत. अशा सूचनाही आमदार गोरे यांनी केल्या.
आमदार गोरे यांनी माण तालुक्यातील दिवडसह विविध गावांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पाण्यात कुजलेली विविध पिके आणि फळबागांचे झालेले नुकसान अधिका-यांना दाखवून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.
चालढकल केली तर गाठ माझ्याशी
विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधणाºया आमदार जयकुमार गोरे यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. भाजपच्या पक्ष बैठकीला मुंबईत हजेरी लावण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाºयांना पंचानामे करण्याविषयी निवेदन दिले होते. मुंबईतून आल्यावर लगेच त्यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन सरसकट पंचनाम्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी तर मोबाईल फोटोवरूनही शेतकºयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकाºयांनी पंचनामे करताना चालढकल केली तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबीही गोरेंनी दिली.