‘आई उदे गं अंबे उदेऽऽ’च्या जयघोषाने औंधनगरी दणाणली!, श्री यमाईदेवीचा रथोत्सव उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 05:45 PM2023-01-07T17:45:59+5:302023-01-07T17:46:53+5:30
रशिद शेख औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत ...
रशिद शेख
औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. भाविकांनी ‘आई उदे गं अंबे उदेऽऽ’च्या जयघोषाने औंधनगरी दणाणून सोडली.
शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्री यमाईदेवी रथोत्सवास शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता प्रारंभ झाला. श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजकन्या हर्षिताराजे यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिरात श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवत षोडषोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात राजकन्या हर्षिताराजे यांच्या हस्ते आणण्यात आली. यावेळी ब्राम्हणवृंदानी पौरोहित्य व मंत्रपठन केले.
यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत देवीचे पूजन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन हर्षिताराजे यांच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे, जितेंद्र पवार, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, नंदकुमार मोरे, अर्जुन खाडे, विजय खाडे, शिक्षक बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव, माजी सभापती संदीप मांडवे, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंत शिंदे उपस्थित होते.
देवीच्या जयघोषात रथोत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाली. रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थांनी रथ ओढून मिरवणुकीस प्रारंभ केला. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्रीयमाईदेवीचे दर्शन घेऊन रथावर एक रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटांची माळ, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल, खोबरे अर्पण केले. ‘आई उदे गं अंबे उदे’चा जयघोष केला. रथाच्या अग्रभागी तेलभुते, डवरी, सनईवाले, गोंधळी, दांडपट्टेवाले, आराधी, घडशी, पुजारी, भोई, माळी या देवीच्या सेवेकऱ्यांनी वेगवेगळ्या पेहरावात देवीचरणी सेवा, कला सादर केली.