स्वेच्छानिवृत्ती घेऊन रत्नागिरीचा पोलिस बनला तस्कर, व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा कट
By दत्ता यादव | Published: May 10, 2023 09:42 PM2023-05-10T21:42:34+5:302023-05-10T21:42:44+5:30
झटपट श्रीमंतीचा हव्यास; पेशंट आणायचाय म्हणून रुग्णवाहिका बुक
सातारा : रत्नागिरी पोलिस दलाच्या एलसीबीसारख्या शाखेत काम केलेल्या निष्णात पोलिस कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेऊन तस्कर बननं पसंत केलं. जेव्हा हे समोर आलं तेव्हा सातारचं पोलिस दलही अवाक झालं. झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा कट चाैघांनी जवळपास तडीसच नेला होता; पण सातारच्या एलसीबीने कायदा राबविण्याचा अनुभव असलेल्या पोलिसाचा कट अखेर धुळीस मिळविला.
किरण भाटकर (वय ५०, रा. भाटीये, ता. जि. रत्नागिरी) हा रत्नागिरी पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी त्यानं म्हणे, पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, पोलिस दलात काम करताना व्हेल माशाच्या उलटीची किंमत काय आहे, हे तो जाणून होता. रत्नागिरीतील सिद्धार्थ लाकडे याच्या ओळखीने हातकणंगलेतील मुंबईस्थित राहणारा अनिस शेख हा व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीमध्ये काम करत असल्याचे त्यांना समजलं. त्यानुसार रत्नागिरीतून व्हेल माशाची उलटी या चाैघांनी घेतली.
त्याची डील मुंबईतील एका धनाड्य व्यक्तीसोबत ठरली; पण तिथपर्यंत उलटी पोहोचवायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण कायदा राबविलेल्या पोलिसाचा अनुभव आणि तस्करी क्षेत्रात पाय घट्ट रोवून डील करणाऱ्या अनिस शेख याच्या डोक्यातून भन्नाट कल्पना समोर आली. जर रुग्णवाहिकेतून आपण मुंबईपर्यंत पोहोचलो तर आपले काम फत्ते झाले, असे समजा.
त्यामुळे त्यांनी रत्नागिरीतीलच रुग्णवाहिका चालक नासिर राऊत याला कऱ्हाडला पेशंट आणायचा आहे, असे सांगून रुग्णवाहका बुक केली. तिघेही रुग्णवाहिकेत बसले. कऱ्हाडपर्यंत आल्यानंतर चालकाने त्यांना आता कुठे जायचे आहे, असे विचारले असता चला सांगतो, तुम्हाला भाडे दिले म्हणजे बास ना, असे म्हणून त्याला पुण्याच्या दिशेने रुग्णवाहिका नेण्यास सांगितले. मात्र, साताऱ्याजवळ आल्यानंतर सातारा एलसीबीने त्यांची रुग्णवाहिका अडविली. तेव्हा निवृत्त पोलिसासह रुग्णवाहिका चालकाचीही पाचावर धारण बसली. जेव्हा पोलिसांनी व्हेल माशाची उलटी जप्त केली तेव्हाच रुग्णवाहिका चालकाला समजलं, पेशंट आणायचा नाही तर व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत आपण अडकलोय. त्यांन खरं खरं सारं पोलिसांना सांगून टाकलं.
तर डील यशस्वी झाली असती...
सहसा रुग्णवाहिका कधीही अडवली जात नाही. त्यामुळे या तस्करांनी रुग्णवाहिका निवडली; पण सातारच्या एलसीबीचे स्ट्राॅंग नेटवर्क त्यांचे कट उद्ध्वस्त करण्यात कारणीभूत ठरले. अन्यथा पाच कोटींची डील त्यांची यशस्वी झाली असती.