उंदीर चालला; हत्ती येणार मुक्कामाला!
By Admin | Published: July 1, 2015 11:06 PM2015-07-01T23:06:52+5:302015-07-02T00:22:26+5:30
जुलै महिन्यातील पाऊस : प्राचीन काळी सांगितलेल्या ठोकताळ्यावरून नक्षत्रातील वाहनांचा अंदाज
प्रदीप यादव -सातारा --जग चंद्रावर पोहोचले असले तरी ढगांतून पाऊस धरतीवर कधी पडणार, यासंबंधी प्राचीन काळी नक्षत्रांवरून सांगितलेले ठोकताळे आजही लोक मानतात. आपल्याकडे पावसाची १२ नक्षत्रे मानली आहेत. प्रत्येक नक्षत्र आपल्या वाहनावर बसून येतं. या नक्षत्र काळात पडणारा पाऊस हा त्यांच्या वाहनाप्रमाणे पडतो, असे सांगितलं जातं. दि. २२ जूनपासून उंदरावरून आलेल्या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस पडत असून ते ५ जुलैला उंदिर जाणार अन् पुनर्वसू नक्षत्र हत्तीवर बसून येणार आहे.
पुनर्वसू (तरणा पाऊस) आणि पुष्य (म्हातारा पाऊस) अशी दोन नक्षत्रं या महिन्यात आहेत. पुनर्वसू हत्तीवर तर पुष्य मेंढ्यावर स्वार होऊन येणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पडणारा पाऊस हत्तीसारखा बरसणार की मेंढ्यासारखा धडक मारणार, हे पाहणेच उचित ठरणार आहे. मेंढा वाहन असलेल्या पुष्य नक्षत्रातला पाऊस शेतीला उपयुक्त असल्याचे म्हटले असले तरी ही दोन्ही नक्षत्र शेतकऱ्यांसाठी तेवढीच महत्त्वाची ठरणार आहेत.
दि. ८ जून रोजी सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. मृगाचे वाहन आहे कोल्हा. कोल्हा हा प्राणी फार चतुर. गोड बोलून एखाद्याला कसे फसवायचे, हे कोल्ह्याकडून शिकावं! जून महिन्यात पावासानं तसंच केलं. काही भागात धो-धो बरसला अन् काही ठिकाणी मात्र ओढ लावून गेला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण आता धूर्त कोल्हा वाहन असलेल्या मृग नक्षत्रातल्या पावसानं दडी मारल्यामुळं दुबार पेरणीचं संकट येतंय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दि. २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्र सुरू झालं असून ते ५ जुलैला संपणार आहे. उंदीर वाहन असलेल्या या नक्षत्रात उंदीर ज्याप्रमाणं एळादी वस्तू कुरतडतो, त्याप्रमाणंच अनियमित असा पाऊस पडला. म्हणजे कधी तुरुतुरू धावला तर कधी बिळात जाऊन लपून बसला, अशीच पावसाची स्थिती झाली. हवामान खात्यानं कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं जास्त पावसाचा अंदाज या महिन्यात वर्तविला होता. परंतु कोल्हा अन् उंदीर या वाहनाप्रमाणंच पाऊस पडल्याचे दिसते.
आता जुलै महिना सुरू झाला आहे. दि. ६ जुलै रोजी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचं वाहन आहे हत्ती. या काळात हत्तीसारखा दमदार पाऊस पडेल, असा अंदाज प्राचीन काळी सांगितलेल्या ठोकताळ्यांवरून जुनीजाणती माणसं बोलून दाखवितात. याला तरणा पाऊस असंही म्हणतात. तरुणवयात माणूस जसा धावतो, त्याप्रमाणं या नक्षत्रातला पाऊस पडतो, असंही जुनी माणसं सांगतात. १९ जुलैला नक्षत्र बदलणार असून सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचे वाहन आहे मेंढा. चतुर कोल्हा अन् सतत बिळात पळणारा उंदीर यांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणेच पाऊस पडल्याचे दिसते. आता जुलै महिन्यात पुनर्वसू नक्षत्रातील पाऊस आपल्या हत्ती वाहनाप्रमाणे दमदार पडतो की पुष्य नक्षत्राच्या वाहनाप्रमाणे मेंढ्यासारखी धडक मारतो, हे पाहणेच उचित ठरेल.
प्रचंड वृक्षतोड करून माणसानं सिमेंटची जंगलं उभी केली आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पूर्वी नक्षत्रांवरून पावसासंबंधी बांधलेले आडाखे आता खरे ठरतीलच असे नाही. पूर्वी वेळेवर मान्सून दाखल व्हायचाच. आता अवेळी पाऊस पडत आहे. हवामानातील बदलामुळे पावसासंदर्भात आता ज्योतिषशास्त्राचेही आडाखे कमी पडणार आहेत.
- रमणलाल शहा,
ज्योतिषतज्ज्ञ, सातारा
नक्षत्रेवाहनकालावधी
रोहिणीउंदिर२५ मे ते ७ जून
मृगकोल्हा८ जून ते २१ जून
आर्द्राउंदिर२२ जून ते५ जुलै
पुनर्वसू हत्ती६ ते १९ जुलै
पुष्यमेंढा२० जुलै ते २ आॅगस्ट
आश्र्लेषागाढव३ ते १६ आॅगस्ट
मघाबेडूक१७ ते ३० आॅगस्ट
पूर्वा फाल्गुनीउंदिर३१ आॅगस्ट ते १२ सप्टेंबर
उत्तरा फाल्गुनीघोडा१३ ते २५ सप्टेंबर
हस्तमेंढा२७ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर
चित्रागाढव११ ते २३ आॅक्टोबर
स्वातीकोल्हा२४ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर
शेतकऱ्यांचे लक्ष नक्षत्रांवर
मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. आता पावसाने उघडीप दिली असली तरी काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच दुष्काळी भागात मात्र शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता त्याचे लक्ष नक्षत्रांकडे लागले आहे. या महिन्यात कोणते नक्षत्र आहे, त्याचे वाहन काय आहे, हे शेतकरी जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नक्षत्रांचा पाऊस कसा असतो, याविषयी ‘लोकमत’ने घेतलेला धांडोळा...
तरणा पाऊस, म्हातारा पाऊस
पुनर्वसू नक्षत्राचे वाहन आहे हत्ती. या नक्षत्र काळात सर्वत्र दमदार पाऊस पडणार, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याला तरणा पाऊस असेही म्हटले जाते. याच महिन्यात दि. २० पासून पुष्य नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. या नक्षत्राचे वाहन आहे मेंढा. या काळात शेतीला उपयुक्त असा पाऊस पडेल असा अंदाज आहे. याला म्हातारा पाऊस असेही म्हटले जाते. म्हातारी माणसं जशी एखादं काम संथगतीने पण सतत करत राहतात. त्याप्रमाणे या नक्षत्रातील पाऊस हा सतत पडत राहतो. जमिनीत मुरणारा पाऊस म्हणून मूरपाऊस असेही म्हटले जाते.