रवींद्र गायकवाडने मारले ‘किसन वीर’चे मैदान
By Admin | Published: February 22, 2015 10:06 PM2015-02-22T22:06:53+5:302015-02-23T00:25:11+5:30
किसन वीर चषक कुस्ती स्पर्धा : पांडुरंग मांडवेला पोकळ घिस्सा डावावर केले चितपट
भुर्इंज : येथील किसन वीर कारखान्यावर प्रचंड जल्लोषात पार पडलेल्या ‘किसन वीर’ चषक कुस्ती स्पर्धेत पै. रवींद्र गायकवाड याने पै. पांडुरंग मांडवे याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून किसन वीरचे मैदान मारले. नारायण महाराज, ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि एक लाख रुपये रोख पारितोषक देऊन गायकवाड याला गौरवण्यात आले. माणकाई देवीच्या यात्रेनिमित्त दोन दिवस सुरू असलेल्या या कुस्ती स्पर्धेची सांगता शनिवारी रात्री झाली. या स्पर्धेत ३५ किलो वजनी गटात प्रणव शिवणकर, ३८ किलो वजनी गटात अक्षय चव्हाण, ४२ किलो वजनी गटात गणेश कणसे, ४६ किलो वजनी गटात निखिल इथापे, ५० किलो वजनी गटात साहिल कणसे, ५४ किलो वजनी गटात अक्षय फणसेयांनी अंतिम लढती जिंकल्या. तर महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचे सुपुत्र संग्राम पाटील व संदेश चव्हाण यांच्यात लावलेली कुस्ती बरोबरीत सुटली. यावेळी हिंद केसरी दादू चौगुले, विनोद चौगुले, बंडा पाटील रेठरेकर, बापू लोखंडे, संभाजीराव पाटील, नामदेवराव मुळे, विष्णू जोशीलकर, साहेबराव पवार, रामा माने, नजरुद्दीन नायकवडी, संतपराव पवार, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, नारायणराव पवार, प्रकाश निंबाळकर, रमेश सोनमळे आदी उपस्थित होते. मैदान यशस्वी पार पडावे यासाठी महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, पै. मधुकर शिंदे, पै. सतिश भोसले, भैय्यासाहेब जाधवराव, पै. शेखर भोसले पाटील, पै. माणिक पवार, पै. राहुल शिंदे, पै. अरविंद नवले यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)
लाख मोलाची मदत
पसरणी येथील एकता दिलीप शिर्के या गरीब शेतकरी कु टुंबातील मुलीने राष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. शेतमजुराची ही मुलगी आर्थिक कारणास्तव मागे राहू नये, यासाठी मदन भोसले यांनी अवघ्या काही मिनिटांत जमा केलेला एक लाख एक हजार शंभर रुपयांचा निधी याच कार्यक्रमात एकताला प्रदान केला. तसेच पांडेवाडी येथील स्रेहल विष्णू मांढरे हिलाही या स्पर्धेतील कामगिरीबद्दल १५ हजारांचा निधी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.