शेतकऱ्याला रावऽऽ रस्ताबी टरकला !
By Admin | Published: June 6, 2017 12:53 AM2017-06-06T00:53:40+5:302017-06-06T00:53:40+5:30
शेतकऱ्याला रावऽऽ रस्ताबी टरकला !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आपल्या न्याय मागण्यांसाठी पहिल्यांदाच संपाचे शस्त्र उगारणाऱ्या पोशिंद्याच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा संकल्प सातारकरांनी केला. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर व्यावसायिकांनी या बंदला संमिश्र पाठिंबा दिला. तसेचज्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती, त्यांना गांधीगिरी करत दुधाचे वाटप करून संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी किसान क्रांती मोर्चाच्यावतीने संप सुरू आहे. या संपाचा एक भाग म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला. शेतकऱ्यांचा आक्रोश केंद्र व राज्य सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा यासाठी सातारा जिल्ह्यातील शहरी भागातील दुकानांसह ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आले होते.
सकाळी आठ वाजल्यापासूनच साताऱ्यातील बाजारपेठ सुरू व्हायला सुरूवात होते. दुकान आणि अंगणातील स्वच्छता, पुजा अर्चा करून दुकाने सरासरी नऊ वाजता सुरू होतात. सोमवारची सकाळ मात्र याला अपवाद होती. सोमवारी बाजारपेठ भलतीच सुस्तावली होती. सकाळी साडे नऊ पर्यंत कपड्यांची दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवेत येणारे मेडिकलही सकाळी उशीरा सुरू झाले. काही मिठाईची आणि बेकरी दुकानाचे अर्धे शटर उघडले होते. त्यातून अत्यावश्यक वस्तु खरेदी करताना सातारकर दिसत होते. पेट्रोल पंप चालकांनी लोखंडी बॅरेकेटस् आणि दगडांच्या मदतीने सर्व वाहनांसाठी प्रवेश निषिध्द केला होता.
सकाळी अकरा नंतर गांधी मैदानापासून शेतकरी संघटनेने मोर्चा काढून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना संपास पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच शेतकरी संघटनेने मोर्चामध्ये आणलेल्या दुधाच्या किटल्यांतून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना दुध देवून संपास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. हा मोर्चा गांधी मैदान पासून खालच्या रस्त्यामार्गे पोवईनाका पर्यंत काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देवून मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा पुढे गेल्यानंतर शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन व्यवहारास सुरूवात केल्याचे चित्र सातारा शहरात दिसले तरी महाराष्ट्र बंद असल्याने ग्राहकांची वर्दळ मात्र बाजारपेठेत कमी होती. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध चौक, मोर्चेकरी यांच्यासह संवेदनशिल ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
मसूर येथे राष्ट्रवादीतर्फे भाजपचा निषेध
मसूर येथे राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्यावतीने भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंंगराव जगदाळे, सभापती शालन माळी, लहुराज जाधव, प्रा.कादर पिरजादे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी विरोधी भूमिका घेणारे भाजप सरकार हे मोघल व इंग्रजांपेक्षाही वाईट असल्याची परखड टिका व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध केला. महाराष्ट्रात भूतकाळात झाला नाही, असा अभूतपूर्व शेतकरी संप भाजप सरकारच्या काळात झाला ही अत्यंत दुदैंवी व लाजीरवाणी बाब असून भाजपचे हे अपयशच आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, कर्जबाजारीपणमुळे शेतक-यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. त्यावर कोणताही तोडगा शासन काढत नाही. साखरेचा व तुरीचा दर वाढला कि भाजप हे साखरेचे व तुरीची आयात करते ही शेतक-यांची कुचेष्ठा भाजप करीत आहे. अशी टीका यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आली.
चक्क रिक्षात दूध!
लेकरांसह रिक्षातून जाणारी माऊली आंदोलकांच्या नजरेस पडली. त्या माऊलीसह तीन मुलंही होती. त्यांना पाहून आंदोलकांनी रिक्षा थांबवायला लावली आणि त्यांना दूध प्यायला दिले. रिक्षात बसूनच या मुलांनी दूध पिण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला.
नीरव शांतता...!
सातारा बसस्थानक आणि परिसरात दिवस रात्र हजारो प्रवाशांचा राबता असतो. त्यामुळे स्थानक परिसरात असलेली दुकानेही भल्या पहाटे ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज असतात. सोमवारी मात्र, बंद असल्यामुळे उन्हं डोक्यावर आली तरी दुकाने उघडली नव्हती. त्यामुळे कायम गजबजाट असलेले हे वर्दळीचे ठिकाण भर दुपारीही असे ओस पडल्याचे सातारकरांनी खूप दिवसांनी पाहिले.
कुलूप अन् हारही!
रोज सकाळी दुकान उघडले की स्वच्छता करून देवाची पुजा करण्यासाठी आवश्यक असलेला हार टाळ्यामुळे बाहेरच थांबला. व्यावसायिकांनी दुकान न उघडल्याने देवाला घालायचा हार कुलपाबरोबर जणू दुकान उघडण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे भासले.