‘रयत’ने तंत्रकुशल पिढी भारताला दिली
By Admin | Published: September 28, 2015 09:58 PM2015-09-28T21:58:04+5:302015-09-28T23:45:20+5:30
सी. विद्यासागर राव : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरवोद्गार
सातारा : रयत शिक्षण शिक्षण संस्थेचा देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेने ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच तंत्रकुशल पिढी देशाला दिली आहे, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी चेअरमन डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सी. विद्यासागर राव म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये संतांनी भक्तीची चळवळ निर्माण केली तर महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी उभारलेली शिक्षणाची चळवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेटाने पुढे नेली. कर्मवीरांच्या चळवळीला लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर मिळाला, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरले. त्यांच्यासारखा ध्येयवादी माणूस होणे नाही. १९२१ साली केवळ २१ टक्के लोक साक्षर होते, त्याच ठिकाणी २0१५ मध्ये ८३ टक्के लोक साक्षर आहेत. १९२१ साली केवळ २ टक्के महिला साक्षर होत्या, तेच प्रमाण वाढून आजच्या घडीला ७0 टक्के इतके झाले आहे. हे आकारास येण्यासाठी रयत चे योगदान मोठे आहे.
दरम्यान, आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच राज्यपालांनी ‘मी मराठी शिकत आहे, मला चांगलं मराठी येत नाही,’ असं म्हणून प्रेक्षकांपुढे इंग्रजीत बोलण्याची अनुमती मागितली. कर्मवीरांच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस,’ असं मराठीतील संतांचे वचन मांडले. (प्रतिनिधी)
सर्व्हे धक्कादायक.. --महाराष्ट्रातील ५0 अभियांत्रिकी महाविद्यालयांचा नुकताच सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये बहुसंख्ये २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे गणित व प्रश्न सोडविण्याची क्षमता १५ वर्षांच्या मुलांपेक्षाही कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे राज्यपालांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.