रयत क्रांती संघटना करणार कारखान्यांसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:32+5:302021-06-24T04:26:32+5:30
सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व ...
सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व कारखाना स्थळावर रयत क्रांती संघटनेतर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
सन २०२०-२१ ऊस गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊसतोड करुन नेलेल्या ऊस बिलाची रक्कम एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना साताऱ्यातील काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु होऊन ९० दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही.
ऊस पिकावर सामान्य शेतकऱ्यांचा कौटुंबिक चरितार्थ व जीवनमान अवलंबून असताना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला एफआरपी देण्याचे आश्वासन देऊन ऊसतोड करत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची एफआरपीची रक्कम न दिल्याने येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना व्यवस्थापनामार्फत एफआरपीची रक्कम देण्यात यावी.
एफआरपीची रक्कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे, तरीसुध्दा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही, याबाबत साशंकता वाटते, असे रयत क्रांती संघटनेतर्फे शंकर शिंदे, मुधकर जाधव, प्रकाश साबळे, दत्तात्रय फडतरे यांनी बुधवारी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.