Sharad Pawar: 'रयत'चे विद्यापीठ जूनपासून सुरू होणार, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 01:28 PM2022-05-09T13:28:37+5:302022-05-09T18:32:15+5:30

सातारा : रयतचं स्वत:चं विद्यापीठ असावं, हे आपणा सर्वांचं स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्याला केंद्र व राज्य ...

Rayat Shikshan Sanstha will work like a university says Sharad Pawar | Sharad Pawar: 'रयत'चे विद्यापीठ जूनपासून सुरू होणार, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar: 'रयत'चे विद्यापीठ जूनपासून सुरू होणार, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

सातारा : रयतचं स्वत:चं विद्यापीठ असावं, हे आपणा सर्वांचं स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या जूनपासून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करू शकू, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथे त्यांच्या समाधीस्थळावर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख आदींनी कर्मवीर अण्णांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संस्थेच्या प्रांगणात झालेल्या समारंभात शरद पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘दोन वर्षांनंतर हा समारंभ होत आहे. आज या समारंभाला न चुकता हजेरी लावणारे डॉ. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे आज नाहीत. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. संस्थेचा मोठा कार्यविस्तार झाला आहे. कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागात शिक्षणाचं जे रोपटं लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. बदलत्या काळाचे आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहोचतेय. त्यात ‘रयत’चा वाटा मोठा आहे, याचा मला अभिमान आहे.’

कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेला २५ लाखांपेक्षा जास्त देणगी देणारे देणगीदार, संस्थेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील निवड झालेले अधिकारी विद्यार्थी, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी व कर्मवीर पारितोषिक मिळविलेले मान्यवर यांचा सन्मान खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची भर घालून २५ लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले, तर संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे आजी-माजी सेवक, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Rayat Shikshan Sanstha will work like a university says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.