‘रयत’चा लिलाव होऊ देणार नाही !

By admin | Published: September 22, 2016 11:09 PM2016-09-22T23:09:51+5:302016-09-23T00:45:29+5:30

विलासराव पाटील-उंडाळकर : संघर्ष माझ्या पाचवीलाच; डगमगत नसल्याचे सांगत बंडखोरांना फटकारले

'Rayat' will not be auctioned! | ‘रयत’चा लिलाव होऊ देणार नाही !

‘रयत’चा लिलाव होऊ देणार नाही !

Next

उंडाळे : ‘रयत कारखाना म्हणजे या भागातील रयतेचा संसार आहे. संघर्ष माझ्या पाचवीलाच पूजला आहे. यापुढेही कितीही संघर्ष झाला तरी रयत कारखान्याचा मी कधीही लिलाव होऊ देणार नाही,’ असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले. राजकारणातला सुरुवातीपासून सुरू असणारा संघर्ष आजही सुरू असला तरी मी डगमगत नसल्याचे सांगत त्यांनी बंडखोरांना फटकारले.
शेवाळवाडी-म्हासोली, ता. कऱ्हाड येथे रयत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विलासराव पाटील-उंडाळकर बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय पाटील, उपाध्यक्ष आप्पासाहेब गरूड यांच्यासह संचालक, सभासद, अथणी शुगरचे संस्थापक पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘डोंगरी भागातील लोकांचे जीवनमान सुधारावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी रयत कारखान्याची उभारणी शेवाळवाडीच्या माळावर केली आहे. हा कारखाना उभा करण्यासाठी माझ्यासह या भागातील अनेक लोकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. काहीनीं तर आपल्या माता-भगिनींचे दागिने गहाण ठेवून भागभांडवल दिले आहे. हे मी कधी विसरू शकणार नाही.
राजकारणामध्ये मी खूप संघर्ष पाहिला आहे. मात्र, मी कधीही डगमगलो नाही. स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांनी आपली जमीन विकून समाजाची सेवा केली. त्याचप्रमाणे गेल्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मीही लोकांची सेवा करीत आलो आहे. सत्तेसाठी कधीही कुणासमोर लाचार झालो नाही आणि यापुढच्या काळातही होणार नाही. माझ्या चारित्र्यावर कुठलाही डाग पडू दिलेला नाही.
रयत कारखान्याच्या उभारणीत परिसरातील जनतेने मोलाचे योगदान दिले आहे. हे कधीही विसरू शकणार नाही. रयत कारखान्यावर ८१ कोटींचे कर्ज असून, अशा परिस्थितीतही अथणी शुगरने गतवर्षीपासून हा कारखाना चालवायला घेतला आहे. तो फक्त आपल्यावर असलेल्या विश्वासामुळेच त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुणाचाही एक पैसा कारखाना बुडू देणार नाही.’
अ‍ॅड. उदय पाटील म्हणाले, ‘अथणी शुगरसोबत रयत कारखान्याचा १९ वर्षांचा करार झाला आहे. या कारखान्यावर असलेले कर्ज फेडून भविष्यात सुमारे अडीचशे कोटींचा असणारा हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होईल. निसर्ग आणि मानवनिर्मित्त अनेक अडचणींमुळे कारखाना चालविताना अडचणी येत आहे. मात्र, आता संचालक मंडळ सक्षम झाले आहे. कोणत्याही अडचणी आल्या तर त्या मोडून काढू, असे सांगत १२ हजार सभासदांपैकी फक्त साडेतीन हजार सभासदच कारखान्याकडे ऊस घालतात. इतर सभासदांनीही ऊस पिकाकडे लक्ष दिल्यास कारखान्याला बाहेरून ऊस आणावा लागणार नाही.’
सभेला सभासदांची मोठी उपस्थिती होती. (वार्ताहर)


जयसिंगराव पाटील अनुपस्थित
उंडाळकर कुटुंबामध्ये कुटुंबातील संघर्ष गत आठवड्यात सर्वश्रूत झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत विलासराव पाटील-उंडाळकर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यावरूनच माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील उपस्थित राहणार का? याचीही उत्सुकता होती. मात्र, जयसिंगराव पाटील अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

Web Title: 'Rayat' will not be auctioned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.