Satara: विहिरी खोदताना आरसीसी पडदी कोसळली, कामगार ठार; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:19 PM2024-05-15T13:19:15+5:302024-05-15T13:19:29+5:30

उंब्रजजवळील भवानवाडी येथील घटना : जखमींमध्ये स्थानिक कामगारांचा समावेश

RCC wall collapses while digging well, worker killed; Three injured in Satara | Satara: विहिरी खोदताना आरसीसी पडदी कोसळली, कामगार ठार; तिघे जखमी

Satara: विहिरी खोदताना आरसीसी पडदी कोसळली, कामगार ठार; तिघे जखमी

सातारा : भवानवाडी, ता. कऱ्हाड येथील उत्तर मांड नदीच्या काठावर नवीन विहिरीचे बांधकाम सुरू असताना एका बाजूची आरसीसी पडदी मातीसह अचानक अंगावर कोसळल्याने एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला जाऊन जागीच ठार झाला, तर तीन ३ जखमी कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. दिलीप पांडुरंग जाधव - पाटील (वय. ६२), रा. अंधारवाडी (ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे.

भवानवाडी, ता. कऱ्हाड येथे उत्तरमांड नदीच्या काठावर संदीप काकासाहेब पवार यांच्या विहिरीचे काही दिवसांपासून काम सुरू आहे. मंगळवारी आरसीसी पडदीचे काम सुरू होते. दिलीप पांडुरंग जाधव-पाटील (वय ६२), शशिकांत रामचंद्र पवार (वय ५८), दोघेही रा. अंधारवाडी (ता. कऱ्हाड), बापूराव सुभाष यादव (वय ६३), दिलीप अशोक यादव, दोघे रा. पठारवाडी (ता. पाटण) हे कामगार ते काम करत होते. दुपारी अचानक ही पडदी आजूबाजूच्या मातीसह विहिरीत कोसळली. तिच्या ढिगाऱ्यात हे चौघेही अडकले.

यातील दिलीप जाधव हा पूर्णपणे गाडला गेला, तर ३ कामगारांचे निम्मे शरीर हे चिखलापासून वर होते. मात्र, पाय आरसीसी बांधकामाच्या स्टीलमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे अवघड बनले होते, ही घटना समजताच ग्रामस्थांनी तातडीने तेथे धाव घेतली. जेसीबी मशिन्स व ग्रामस्थांच्या मदतीने साडेचार वाजेच्या सुमारास एका कामगारास विहिरीतून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे व पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्यात सामील झाले.

बचाव कार्यात पावसाचा अडथळा

विहिरीत अडकलेल्या इतर दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि मदत कार्य थांबले. पाऊस थांबल्यानंतर इतर दोन कामगारांना विहिरीच्या खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला दिलीप जाधव-पाटील हा कामगार जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह तेथील गाळ काढून नंतर बाहेर काढण्यात आला.

मशिन्सचे जुगाड यशस्वी

विहीर खोल असल्यामुळे व कामगार आत असल्याने जेसीबीचे मशीन विहिरीच्या एका बाजूला उभे करण्यात आले होते; परंतु त्यांचे खोरे कामगारांपर्यंत पोहोचत नव्हते. यामुळे ग्रामस्थांनी आणखी एक जेसीबी मशीन आणली. पहिल्या मशीनला पाठीमागून या मशीनचा घट्ट आधार देण्यात आला. घटना घडलेल्या विरुद्ध बाजूने विहिरीत उतरवले. त्यामुळे मदत कार्य सोपे झाले. जुगाड यशस्वी झाले.

अधिकाऱ्यांनी रस्त्यावरून घेतली परिस्थितीची माहिती

घटना घडल्यानंतर काही अधिकारी घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या डांबरी रस्त्यावर उभे होते. तेथूनच घटनास्थळी जाण्यासाठी चिखल तुडवत व पावसात भिजत जावे लागणार होते. मात्र, या अधिकाऱ्यांनी डांबरी रस्त्यावरच उभे राहण्यात धन्यता मानली. तेथेच फोटो सेशन केले.

Web Title: RCC wall collapses while digging well, worker killed; Three injured in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.