‘भेळ’मुळे फुटली भीषण खुनाला वाचा!
By admin | Published: September 5, 2014 10:20 PM2014-09-05T22:20:52+5:302014-09-05T23:27:20+5:30
अनैतिक संबंधातून खून : मुंबईतील व्यावसायिकाचा मृतदेह तब्बल २१ दिवसानंतर जगासमोर
वाठारस्टेशन : दोन दिवसापूर्वी सातारा शाहू स्टेडियम परिसरातील एका भेळेच्या गाडीजवळ उभारलेल्या दोन माणसांमध्ये मुंबईच्या खुनाची कुजबुज सुरू होती. ‘भेळवाला’ही चाट-मसाला तयार करताना ही कुजबूज बारकाईने ऐकत होता. याच दरम्यान, यातल्या एकाची या भेळवाल्याबरोबर वादावादी झाली. भेळवाल्याने लगेच रस्त्यावर शेजारीच उभारलेल्या पोलिसाला बोलाविलं...अन् इथंच फुटली खुनाला वाचा.सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी वैराटला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं थेट मुंबईतील घाटकोपरच्या खुनाचंच रहस्य उलगडलं. सातारा पोलिसांनी मग तत्काळ त्याला वाठार पोलिसांच्या ताब्यात दिलं. भेळीच्या गाड्यावरील भेळवाल्याच्या चतुराईमुळं अखेर २१ दिवसापूर्वी घाटकोपरच्या व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा झाला.
सातारा, बारामती अन् मुंबई या तिन्ही शहरातील हा ‘क्राईम’चा प्रवास अखेर कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी भाडळे घाट हद्दीवरील वनीकरणात संपला. प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय.
घाटकोपर येथील कलविरसिंग इतर महिलांशीही संबंध बाळगत असल्याचा तिचा संशय होता. हा राग दिवसेंदिवस वाढू लागला. अखेर कलविरसिंगच्या खुनाचा कट रतनच्या डोक्यात बसला. तिने यासाठी आपल्या मानलेला भाऊ ववेक अशोक येवले याला हा प्रकार सांगितला.मग कटाची तारीख ठरली. १३ आॅगस्टचा दिवस निश्चित झाला.१३ रोजी रतनने कलविरसिंग यांना आपल्या राहत्या घरी बोलवून घेतले. यावेळी कोरेगाव तालुक्यातील अंबवडे (सं) येथील रतनचा मानलेला भाऊ विवेक अशोक येवले याच्यासह निखील वाघमळे, राजेश कांबळे, संतोष बनसोडे, पृथ्वीराज वैराट, दिपक आवळे व रतन गायकवाड यांनी कलविरसिंगचा तोंडावर उशी दाबून खून केला. त्यानंतर कलविरसिंग यांच्याच मालकीच्या फोर्ड इकोस्पोर्ट (क्र. एम. एच ०३ ५७५७) या गाडीत हा मृतदेह घालून सातारा जिल्ह्यातील वाठारस्टेशन परिसरातील भाडळे घाट या डोंगराळ ठिकाणी सारेजण आले. आणला. सामाजिक वनीकरणाच्या परिसरात हा मृतदेह रॉकेल ओतून पेटवून दिला. त्यानंतर सारे गाडी घेऊन पळून गेले.
मात्र, अधून मधून येणाऱ्या पावसामुळे मृतदेह अर्धवट जळून गेला. तर जंगली श्वापदांनी काही प्रमाणात तो संपवला होता. परंतु या भागात शक्यतो कुणी येत नसल्याने कुठेही या प्रकाराची चर्चा देखील झाली नाही.दुसरीकडे १३ आॅगस्ट पासून घरी न परतलेल्या कलविरसिंगाचा शोध सुरू होता. १४, १५ तारखेलाही ते न परतल्याने १५ आॅगस्ट रोजी हरजिंदर सिंग व देवेंद्र सिंग यांनी फलविरसिंग गायब असल्याची तक्रार घाटकोपर पोलीस ठाण्यात दिली. तेव्हपासून ते आजपर्यंत त्यांचा शोध सुरूच होता.
दरम्यान, सातारच्या भेळवाल्यामुळे या खुनाला वाचा फुटली. पोलीस लगेच कामाला लागले. ४ सप्टेंबर रोजी रात्री कलविरसिंग गुज्जर यांच्या मृतदेहाची व त्यांच्या गाडीची नातेवाईकांकडून ओळख पटल्यानंतर संबंधित महिलेसह सात आरोपींना वाठार पोलिसांनी ताब्यात घेतले.विवेक अशोक येवले याने खुनानंतर ही गाडी आपल्या मामाकडे लावली होती.ती पोलिसांन्ी जप्त केली.२१ दिवसांच्या या गूढ रहस्याचा उलगडा झाला तो केवळ साताऱ्याच्या भेळीवाल्यामुळे. (वार्ताहर)
अखेर शोधाचा प्रवास संपला...
१३ आॅगस्ट पासून घरी न परतलेल्या कलविरसिंगांचा शोध आजपर्यंत सुरूच होता. अखेर ४ सप्टेंबरच्या रात्री कलविरसिंग गुज्जर यांच्या मृतदेहाची व त्यांच्या गाडीची वाठार पोलीस ठाण्यात ओळख पटल्यानंतर शोधाचा प्रवास संपला.