पाटण तालुक्यात रुजतेय वाचन संस्कृती, शिक्षकांचा उपक्रम : वाचनाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:52 PM2020-11-12T15:52:05+5:302020-11-12T15:53:54+5:30
literature, coronavirus, mobile, teacher, sataranews कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. मुलांना बाहेर खेळण्यास बंदी आहे. मोबाईलवर शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासातून लहान मुलांना सध्या वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
रामापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. मुलांना बाहेर खेळण्यास बंदी आहे. मोबाईलवर शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासातून लहान मुलांना सध्या वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
राज्यासह तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद आहेत. मात्र शाळा बंद असल्या तरी अभ्यास चालू आहे. पाटण तालुक्यातील काही प्राथमिक शिक्षक डोंगरावरील आपल्या शाळेतील मुलांच्या घरी जाऊन अभ्यास देत आहेत. दिलेला अभ्यास तपासून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. यासोबत मुलांना वाचनाची आवड निर्माण करून त्यांना शालेय पुस्तकाबरोबर इतर अवांतर वाचनाचा आग्रहदेखील करत आहेत. त्यातून मुलांमध्ये वाचन कौशल्य विकसित करत आवड निर्माण करत आहेत.
तंत्रस्नेही शिक्षक मोबाईल आणि संगणकाचा वापर करून मुलांना शिक्षण देत आहेत. मात्र तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तंत्रज्ञानचा प्रसार झाला; पण विकास अजून वाडी-वस्तीवर पोहोचला नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक नवनवीन संकल्पना विकसित करत मुलांना शिक्षण देत आहेत. त्यांच्यात वाचनाची गोडी वृंद्धिगत व्हावी, यासाठी काही शिक्षक आवर्जून प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यांना चांगल्या लेखकांच्या पुस्तकाची नावे सांगून पुस्तके वाचनासाठी प्रवृत्त करत आहेत. त्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काहींनी चांगल्या पुस्तकाच्या ऑनलाईन लिंक मुलांना दिल्या आहेत. काही शिक्षकांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून तालुक्यात पुन्हा वाचन संस्कृती रुजताना दिसत आहे.