किडगाव विभागातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:10+5:302021-01-14T04:32:10+5:30
किडगाव : लिंब जिल्हा परिषद गटातून आणि किडगाव पंचायत समिती गणातून तब्बल आठ गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे असलेले धुमशान ...
किडगाव : लिंब जिल्हा परिषद गटातून आणि किडगाव पंचायत समिती गणातून तब्बल आठ गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे असलेले धुमशान शेवटच्या टप्प्यात आले आहे. येत्या शुक्रवारी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला आता शेवटच्या टप्प्यात रंगत चढत असून, निवडणुकीमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार, याबाबत गावातल्या गल्लीबोळात एकच चर्चा होत आहे.
लिंब जिल्हा परिषद गटावर सध्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पकड मजबूत आहे. शिवेंद्रराजे भोसले यांना मानणारा गट या विभागात असून, काही ग्रामपंचायतींवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटातून उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. काही गावांमध्ये सर्व गटांना मानणारा विचार पुढे घेऊन काहीजण आपले नशीब आजमावत आहेत, तर काही गावांत राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
वर्ये गावात दुरंगी लढत होत असून, नेले गावांमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा एक गट, तर खासदार उदयनराजे भोसले यांचा दुसरा गट आमने-सामने उभे आहेत. किडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्धी गट दोन्ही राजेंची विचारसरणी घेऊन पुढे चालणार आहेत. कळंबे गावामध्ये दुरंगी लढत होत असून, याही ठिकाणी दोन्ही महाराजांना मानणारा गट असला तरी एक गट राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी असणारा आहे. त्यामुळे या गावाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कोंडवे गावामध्ये जोरदार प्रचाराला वेग आला असून, या ठिकाणी दोन्ही राजेंना मानणारा गट आहे. सारखळ ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत होत असून, या ठिकाणी दोन्ही राजेंचे कार्यकर्ते आमने-सामने उभे आहेत. हमदाबाद गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन गट आमने-सामने उभे ठाकले असून, याही गावात दोन्ही राजेंचे वर्चस्व आहे. लिंब जिल्हा परिषद गटातून कुशी आणि पिंपळवाडी या दोन छोट्याशा गावांनी ग्रामपंचायती बिनविरोध करून मोठ्या गावांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे.
(चौकट..)
गावकीबरोबर भावकी सांभाळण्यासाठी जीवाचे रान...
सध्या वैयक्तिक गाठीभेटींबरोबर काही स्थानिक नेते गावकीबरोबर भावकी सांभाळण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका ग्रामीण जीवनाचा खरा पाया असला तरी मतदारांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी नेतेमंडळी जीवाचे रान करीत आहेत. या विभागातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये निकाल काहीही लागला तरी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा पगडा असल्याचे पाहायला मिळणार आहे.