पवारांनी आदेश दिला तर लढायची तयारी; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने साताऱ्यात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:52 PM2024-04-01T15:52:41+5:302024-04-01T15:55:00+5:30
Satara Lok Sabha: साताऱ्यात शरद पवारांकडून धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
Prithviraj Chavan ( Marathi News ) :सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र पक्षात फूट पडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट वेगळा झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना आपल्या नव्या पक्षासाठी सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार शोधताना कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली आहे. अशा स्थितीत साताऱ्यात शरद पवारांकडून धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"या मतदारसंघात सर्वांत सक्षम उमेदवार कोण, हे शोधण्याचं काम सुरू आहे. तो उमेदवार सर्वमान्य असेल. माझं नाव काही लोकांनी आणि मीडियाने चर्चेत आणलं आहे. मात्र शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे," अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. तसंच "जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते मला भेटले. सातारा लोकसभा मतदारसंघ त्यांच्या पक्षाकडे आहे. या मतदारसंघातील उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. मात्र त्या उमेदवाराच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, असं आम्ही त्यांना जाहीरपणे सांगितलं आहे. जातीयवादी शक्तींचा या मतदारसंघात प्रवेश होऊ नये, यासाठी आम्ही आणि आमचे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत. त्यासाठी तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचं काम करायला आम्ही तयार आहोत," असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीतून आणखी कोणत्या नावांची चर्चा?
खासदार श्रीनिवास पाटील सातारा मतदारसंघातून माघार घेतल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या जागेसाठी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे.
श्रीनिवास पाटलांच्या माघारीवर काय म्हणाले शरद पवार?
श्रीनिवास पाटील यांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी म्हटलं होतं की, "लोकसभेत श्रीनिवास पाटील यांनी चांगले काम केले. पुन्हा त्यांनी एकदा निवडणुकीत उभं राहावं अशी आमची मागणी होती. पण, त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. मी जरी उमेदवारी घेतली नाही तरी मी पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करेन असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं," अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच सातारा जिल्हा आम्हाला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. साताऱ्यात उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं.