नगरपालिकेच्या राजधानी टॉवर्समध्ये घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:28+5:302021-06-11T04:26:28+5:30
फलटण : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते. मात्र स्वच्छता तर सोडाच पालिकेच्या मालकीच्या ...
फलटण : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते. मात्र स्वच्छता तर सोडाच पालिकेच्या मालकीच्या व अगदी नाकासमोर असलेल्या राजधानी टॉवर्समधील पार्किंगमध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या साचलेल्या पाण्यावर डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारख्या आजाराला स्वतः फलटण पालिकाच खतपाणी घालत असल्याचा प्रकार फलटणमध्ये सुरू आहे.
फलटण नगरपालिकेच्या मालकीचे व बहुउद्देशीय असे ‘राजधानी टॉवर्स’ व्यापारी संकुल उभे केले आहे. येथे अतिक्रमण झाल्याची घटना समोर आली असतानाच या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून, या पाण्यास दुर्गंधी येत आहे. तर पावसाळ्यात आजारांना आवरण्यासाठी नालेसफाईच्या कामांना गती दिली जाते व ही कामे करून घेतली जातात, मात्र साफसफाई राहू द्या, ती फक्त वर्षानुवर्षे कागदावर व ठेकेदाराला श्रीमंत करण्यासाठीच असते. यामुळे वेगळी अपेक्षा शहरवासीयांना नसते; परंतु पालिकेच्या व मुख्याधिकाऱ्यांच्या अगदी नाकासमोर असलेल्या राजधानी टॉवर्समध्ये पावसाचे पाणी साचून अक्षरशः एवढ्या मोठ्या संकुलाचा उकिरडा केला आहे. दरम्यान, या साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढले असून, या ठिकाणची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
(चौकट)
आजाराला रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे
राजधानी टॉवर्सची निर्मिती करून व्यापाऱ्यांना यामधील दुकाने विकली आहेत. मात्र, या ठिकाणी शहर अभियंता अथवा सिटी इंजिनीअर यांनी या तळघरात केलेल्या पार्किंगमध्ये साचलेले पाणी व कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार न करता या इमारतीचे बांधकाम केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वच्छता अभियानामध्ये सर्वात खाली असलेल्या पालिकेने कमीत कमी नाकासमोर असलेल्या ठिकाणी तरी स्वच्छता करावी व डेंग्यूसारख्या आजाराला रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
१०फलटण घाण
फलटण नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या राजधानी टॉवर्समधील पार्किंगमध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. (छाया: नसीर शिकलगार)