बंडखोरी अन् विरोधकांचे डावपेच
By admin | Published: July 5, 2016 11:31 PM2016-07-05T23:31:11+5:302016-07-06T00:26:30+5:30
मेढा नगरपंचायत : राष्ट्रवादी आणि शिवसेना येणार आमने-सामने
आनंद गाडगीळ --मेढा -‘मेढा नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल,’ असा विश्वास जावळी-साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. मात्र, याबरोबरच पक्षातील अंतर्गत कुरबुरी थांबल्या नाहीत तर स्वतंत्र पॅनेल करण्याचा इशारा बंडखोरांनी दिल्यामुळे जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडोबा थंडोबा होणार का? याबाबत पक्षांतर्गत चर्चा रंगणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी येथील वातावरण चांगलेच तापले आहे.
मेढा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवसांपासून श्रेयवादावरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा नगरपंचायतीचे श्रेय आमचे आहे, या विधानाला आक्षेप घेत शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय सुर्वे यांनी प्रतिआव्हान दिले. याबाबत राष्ट्रवादीचे चंद्रकांत देशमुख यांनी प्रतिउत्तर दिले. अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वसंतराव मानकुमरे, पांडुरंग जवळ, चंद्रकांत देशमुख, डॉ. संपतराव कांबळे उपस्थित होते.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘जावळी तालुक्यात व मेढा शहरात विविध विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केली आहेत, तर उर्वरित कामेही केली जातील. विरोधकांनी काय काम केले हे दाखवावे, असे आवाहन करताना कामापुरते कारखान्यावर येणारे व नंतर विरोध करणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, असा टोला लगावला. तालुक्यात किंवा मेढा शहरात मतदान मिळाले म्हणजे गाव आपल्या पाठीशी आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. मेढा शहराची निवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील. मात्र, निवडणुकीची वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरेल व विरोधकांचा धुव्वा उडवेल.’
दरम्यान, आमदार भोसले यांनी पक्षांतर्गत कुरबुरींना पूर्णविराम देण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचक वक्तव्यांचा बंडोबांवर किती परिणाम होणार की ते बंड करणार? याकडे जावळीकरांचे लक्ष लागले आहे. मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपा असा सामना होणार की पहिलीच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होणार? याबाबत मात्र, सध्या तरी तर्क वितर्कांची रंगले आहेत. (प्रतिनिधी)
तालुक्यात फितुरी खपवून घेणार नाही
‘तालुक्यात पक्षात किरकोळ मतभेद असतील, ते मिटवले जातील. या निवडणुकीत मेढ्याचे नेते पांडुरंग जवळ यांच्या नेतृत्वाखाली नव्या जुन्यांना संधी देण्यात येईल. मात्र, बंडखोरांनी ऐन निवडणुकीत पक्षाची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्यास, फितुरी केल्यास, स्वतंत्र पॅनेल उभे केले जाईल, असा इशाराही भोसले यांनी दिला. दरम्यान, कोणाची किती ताकद आहे हे निवडणुकीत दाखवूच,’ असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.