राजे गटापुढे बंडखोरीचे आव्हान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:39+5:302021-01-14T04:32:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : फलटण तालुक्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे उमेदवारांकडून पायाला ...

Rebellion challenge before the kings group! | राजे गटापुढे बंडखोरीचे आव्हान !

राजे गटापुढे बंडखोरीचे आव्हान !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : फलटण तालुक्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे उमेदवारांकडून पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू आहे. तर या निवडणुकीत राजे गटापुढे अंतर्गत बंडखोरीचे आव्हान असून, सत्तांतराच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांकडून समस्यांचा पाढा वाचला जात आहे.

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे २ दिवस राहिल्याने संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यासाठी उमेदवारांसह राजकीय नेते व कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून पळत आहेत. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राजे गटाचीच सत्ता आहे. मात्र, असे असले तरी ही सत्ता अबाधित राखण्यासाठी राजे गटापुढे अनेक ठिकाणी गटातीलच बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे.

अनेक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित राजे पॅनेलच्या निवडणुकीतील रणनितीवर स्वत: विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक राजकीय घडामोडींमुळे रामराजेंनी प्रतिष्ठेची केली असल्याचे सांगितले जात आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर तालुक्यातील प्रचार यंत्रणेत पूर्णपणे कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार ‘मी देखील राजे गटाचाच आहे’ असा उघड-उघड प्रचार करत असल्याने ‘नक्की राजे गटाचा कोण?’ हा मतदार व कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी संजीवराजेंना मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेल्या विविध गावातील पॅनेलच्या रणनितीवर स्वत: माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर लक्ष ठेवून आहेत. प्रमुख ठिकाणी सभा, बैठका, मतदारांच्या गाठीभेटीदेखील ते घेत आहेत. तालुक्यात चांगला संपर्क असलेले नेते दिगंबर आगवणेही समर्थकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसत आहे. दरम्यान, तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यामधील सहा गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित ठिकाणी मात्र चांगलाच रंग भरला आहे.

चौकट :

साखरवाडीत तिरंगी लढत...

फलटण तालुक्यात विशेषत: कोळकी, साखरवाडी, निंभोरे आणि जाधववाडी (फ.) या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती मानल्या जातात. यापैकी कोळकी ग्रामपंचायतीच्या एका प्रभागात राजे गटांतर्गत मैत्रीपूर्ण लढत तर काही प्रभागात नावापुरते निवडणुकीचे वातावरण आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये राजे गटाचे अधिकृत उमेदवार, राजे गटाचे बंडखोर उमेदवार आणि भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. साखरवाडी ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत होत असून, राजे गट, पाटील गट आणि विक्रम भोसले गट अशी निवडणूक रंगणार आहे. न्यू फलटण शुगर वर्क्सचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनाही मानणारा वर्ग याठिकाणी आहे. सरपंच कुणाला करायचे? सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायची? यामध्ये पाटील गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल, अशी चर्चा सुरु आहे.

...............................................................................

Web Title: Rebellion challenge before the kings group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.