रेवंडे खूनप्रकरणी गावकरी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:42 PM2018-02-14T23:42:49+5:302018-02-14T23:42:49+5:30
सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परळी खोºयातील रेवंडे परिसरात घडलेल्या या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले. तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांना धारेवर धरले. ‘तुम्हाला हे प्रकरण माहिती असताना तुम्ही तक्रारीची वाट कशी काय पाहू शकता, ‘सुमोटो’ने गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असे त्यांना सुनावले.
दरम्यान, या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे त्यावेळचे ठाणे अंमलदाराकडून खुलासा मागविण्याचे आदेशही अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.
वास्तविक, माने नामक व्यक्तीचा मृत्यू होऊन तब्बल दहा दिवस झाले होते. त्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीदिवशीच एका अधिकाºयाला एका जागृत नागरिकाने या भीषण घटनेची कल्पना दिली होती. त्यानंतर चवरे यांनी आपले काही सहकारी रेवंडे परिसरात पाठवून पीडित मुलीचा जबाब घेऊन केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परंतु मूळ घटनेला पोलिसांनी बगल दिल्याचा आरोप काही नागरिकांकडून झाल्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाची सत्यता तपासली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या माने नामक व्यक्तीचा मृतदेह दरडीमध्ये आढळून आल्यानंतर त्यांच्या भावाने माझ्या भावाचा घातपात झाल्याचा आरोप केला. त्यामुळे पंच कमिटीने ताडीची बैठक घेऊन झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून वाच्यता न करण्याचे फर्मान सोडले. एवढेच नव्हे तर एका कागदावर अकरा जणांच्या सह्या घेऊन संबंधित खुनाचा गुन्हा कबुल करून ‘ग्रामस्थ जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे लिहूनही दिले. असे असतानाही म्हणे पोलिसांना तक्रार हवी होती. गावच्या समांतर न्यायालयामध्ये हा न्यायनिवाडा झाला असताना पोलिसांना तक्रारदार कसा मिळेल? असाही प्रश्न उपस्थित होतो.
अनेकांची चौकशी सुरू..
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. बुधवारी दुपारी रेवंडे परिसरात जाऊन या प्रकरणातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.