यशवंतरावांच्या जन्मघराजवळ पुन्हा बांधकाम
By admin | Published: January 3, 2017 11:38 PM2017-01-03T23:38:31+5:302017-01-03T23:38:31+5:30
आदेश धुडकावला : बंदी असूनही सिमेंट वापरून अंगण तयार करण्याचा प्रयत्न
देवराष्ट्रे : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील स्मारकाच्या जागेसाठी त्यांच्या जन्मघराच्या परिसरातील बांधकामांना शासनाने बंदी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी अशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पुन्हा बांधकाम केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाचा आदेश धुडकावून लावत काहींनी पुन्हा बांधकामे सुरू केली आहेत. तशी तक्रार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे येथील बहुचर्चित स्मारकाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला आहे. या स्मारकासाठी शासनाने २ कोटी १७ लाखांच्या खर्चाचा आराखडा केला आहे. शिवाय परिसरातील २४० चौरस मीटर जागा राखीव ठेवली आहे. यामुळे या जागेत कोणीही बांधकाम करू नये, असा आदेश प्रशासनाने दिला होता.
राज्य पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेले हे स्मारक मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे देखभालीसाठी देण्यात आले आहे. त्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. जन्मस्थळाशेजारी बहुउद्देशीय स्मारक बांधण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा जागेची पाहणी केली. चव्हाण यांच्या घराशेजारील परिसरात खासगी जागा असून, ती स्मारकासाठी मिळावी, यासाठी शासनाने व ग्रामस्थांनी अनेकवेळा पाठपुरावा केला, पण काहींच्या आडमुठ्या धोरणामुळे जागा उपलब्ध झालेली नाही. तत्कालीन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेश काढून, जन्मघर परिसरात कोणतेही बांधकाम करू नये, असे आदेश जारी क रून बांधकामावर बंदी घातली होती. या आदेशामुळे २०१४ पासून येथे सुरू असलेली बांधकामे बंद होती.
मात्र यंदा दिवाळीच्या दरम्यान काहींनी अचानक बांधकामे सुरू केली, पण ती प्रशासनाने थांबवली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल मागविला होता. त्यानंतरही काहींनी बांधकामे सुरू केल्याने, चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक मनोज सोनवलकर यांनी तेथे धाव घेत असे बांधकाम जमीनदोस्त केले होते. पुन्हा बांधकाम केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता.
या कारवाईला काही दिवसांचा अवधी होताच, आता पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याने प्रशासनाने कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. याबाबत प्रतिष्ठानच्यावतीने मोहिते यांनी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)
मंडल अधिकाऱ्यांकडून चौकशी
बेकायदेशीर बांधकाम व संपादित केलेल्या जागेबाबत कायदेशीर कागदपत्रे ६ जानेवारीरोजी मंडल कार्यालयात घेऊन उपस्थित राहण्याबाबतची नोटीस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला देण्यात आली आहे. ही कागदपत्रे दाखल न केल्यास अर्ज निकालात काढण्याची सूचना देण्यात आली आहे.
न्यायालयाकडून बेकायदा बांधकामांना स्थगिती
या जागेत बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या बांधकाम परवान्याविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने या जागेत नवीन बांधकामाला स्थगिती दिल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुरेश मोहिते यांनी दिली.