आरटीओ ब्रेक टेस्ट ट्रॅकला आचारसंहितेचे ग्रहण, प्रस्ताव लटकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:49 PM2019-05-08T12:49:15+5:302019-05-08T12:54:14+5:30
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मंजूर झालेला ब्रेक टेस्ट ट्रॅकला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. या ट्रॅकच्या बांधणीसाठी वर्ये येथील तब्बल ५ एकर जागा कार्यालयाला मिळाली असली तरी बांधकाम विभागातून लोकसभेची आचारसंहिता लागल्याने टेंडर प्रक्रिया होऊ शकलेली नाही.
सागर गुजर
सातारा : सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मंजूर झालेला ब्रेक टेस्ट ट्रॅकला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. या ट्रॅकच्या बांधणीसाठी वर्ये येथील तब्बल ५ एकर जागा कार्यालयाला मिळाली असली तरी बांधकाम विभागातून लोकसभेची आचारसंहिता लागल्याने टेंडर प्रक्रिया होऊ शकलेली नाही.
सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना पासिंगसाठी कऱ्हाड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारावे लागत होते. यामुळे वाहनधारकांचे आर्थिक नुकसान तर होतच होते; पण वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
वर्ये, ता. सातारा येथील अडीच हेक्टर म्हणजे तब्बल ५ एकर जागा ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी आरटीओ कार्यालयाच्या नावावर करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असल्याने वाहनांच्या पासिंगसाठी कऱ्हाडवारी थांबेल, अशी वाहनधारकांमध्ये निर्माण झाली.
लोकमतने या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर ट्रॅकसाठी जागा उपलब्ध झालेली आहे. दरम्यान, या जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार होणे गरजेचे आहे. आरटीओ कार्यालयाच्या नावावर ही जागा झालेली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तो तयार केला जाणार आहे. यासाठी टेंडर प्रोसेस होणे आवश्यक होते. मात्र ऐनवेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ती प्रक्रियाही लटकलेली आहे.
साताऱ्यात कार्यालय असतानाही फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, वाई, माण, खटाव, कोरेगाव, जावळी, सातारा या तालुक्यांतील वाहनधारकांना डिझेल खर्च करून पासिंगसाठी कऱ्हाडला जावे लागत होते. आनेवाडी, तासवडे येथील टोलनाक्यावर टोल दिल्याशिवाय वाहने पुढे जाऊ शकत नाहीत. ही वाहने साताऱ्यातच पासिंग झाली तर त्यांचा हा खर्च वाचणार, हे लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जागा मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
ब्रेक टेस्ट ट्रॅकची यासाठी गरज
व्यावसायिक वापराच्या वाहनांची प्रतिवर्षी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बे्रक टेस्ट घेतली जाते. रिक्षा, टॅक्सी, जीप या वाहनांची बे्रक टेस्ट करून त्यांना वर्षभर वापरासाठी परवाना दिला जातो.
सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी यंत्रणेच्या माध्यमातून ट्रॅक बांधण्यात आलेला आहे. वाहनधारकांना पासिंगसाठी कऱ्हाडला जावे लागत होते. या ट्रॅकमुळे पासिंगची सुविधा उपलब्ध झालेली आहे. रोजी ७० ते ८० व्यावसायिक वाहनांचे बे्रक टेस्ट याठिकाणी केले जात आहेत.
- संजय धायगुडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा