अलीकडचं झालं; आता पलीकडचं कधी ?
By Admin | Published: February 1, 2015 10:36 PM2015-02-01T22:36:38+5:302015-02-02T00:04:05+5:30
मात्र रस्त्याचे चौपदीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यात आली. परंतु बसस्थानक हे वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे चांगला व्यवसाय होत होता
सातारा : काँग्रेसभवनाजवळ असलेली सर्व अतिक्रमणे हटविली. मात्र, एवढ्या दिवस या ठिकाणी बसूनही आम्ही कोणतीही तक्रार केली नाही. मात्र, या कारवाईमध्ये सरळसरळ दुजाभाव दिसत आहे, असा आरोप करत व्यावसायिकांनी आता अलीकडचं अतिक्रमण काढलं; मात्र पलीकडचं कधी काढणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.बांधकाम विभाग आणि नगर पालिकेने शनिवारी बसस्थानकासमोरील अतिक्रमण हटविली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी लगेच काही ठिकाणी पुन्हा व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे दिसून आले. बसस्थानकाशेजारी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी हातगाडे, छोटे-मोठे व्यावसायिक बसले होते. मात्र रस्त्याचे चौपदीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यात आली. परंतु बसस्थानक हे वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे चांगला व्यवसाय होत होता. त्यामुळे रविवारी काही दुकानदारांनी त्याच ठिकाणी दुकान थाटले होते. इतर ठिकाणी मात्र शुकशुकाट होता. (प्रतिनिधी)
पंपाच्याच जागेतून रस्ता : शहा
पोवई नाक्यावरील कालिदास पेट्रोल पंप हटविण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने आग्रह धरण्यात आला होता. आज या पंपाच्या शेडचे पत्रे काढण्यास सुरुवात झाल्यामुळे पंपाचे मालक विपुल शहा यांच्याकडे याबाबत चौकशी केली. ते म्हणाले, ‘जुना महामार्ग करतानाच तो पेट्रोल पंपाच्या हद्दीतून करण्यात आला आहे. आजही या रस्त्याच्या खाली जुनी टाकी आढळून येईल. दुसरी टाकी बांधून आम्ही पंप पुन्हा सुरू केला होता. काल मी विवाह समारंभानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. वाद नकोत म्हणून इतरांनी शेडचे पत्रे उतरविण्यास सुरुवात केली. मात्र, आज मी आल्यावर हे काम थांबविले. जिल्हाधिकाऱ्यांसह १२ ना-हरकत परवाने घेऊन हा पंप सुरू करण्यात आला आहे. पूर्वीही तो अतिक्रमण म्हणून काढण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हापासूनच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.’