सातारा जिल्ह्यातील मंडल कार्यालयांची पुनर्रचना
By admin | Published: July 4, 2017 01:55 PM2017-07-04T13:55:01+5:302017-07-04T13:55:01+5:30
नवीन समाविष्ट गावांच्या सजांचे प्रारुप आरखडे तयार करणार, नागरिकांच्या हरकती व सूचना आमंत्रित
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0४ : राज्यातील तलाठी सजा आणि मंडल कार्यालयांची पुर्नरचना केली जाणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन समाविष्ट गावांच्या सजांचे प्रारुप आरखडे तयार केले जाणार आहेत. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घ्याव्यात. ३१ आॅक्टोबरपर्यंत नवीन तलाठी, मंडल कार्यालयांची अधिसूचना जाहीर करावी, असे आदेश महसूल विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
या संदर्भात राज्य शासनाने दि. २५ मे रोजी निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सहा महसूल विभागांमध्ये एकूण ३ हजार १६५ नवीन तलाठे सजे आणि ५२८ मंडल निर्माण होणार आहेत. त्या संदभार्तील वेळापत्रक राज्यस्तरीय महसूल परिषदेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सध्या सर्व विभागीय आयुक्तांकडून नवीन तलाठी सजांची जिल्हानिहाय संख्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन दिली जात आहे.
पुणे विभागासाठी ४६३ तलाठी सजे आणि ७७ मंडल कार्यालये नव्याने स्थापन होणार आहेत. यात सातारा जिल्ह्यातही नवीन सजे आणि मंडल कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंत सर्व प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदारांची समिती स्थापन करुन तालुकानिहाय माहिती संकलित करण्यात येणार होती. या माहितीचा अहवाल संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.
दि. ३१ आॅगस्ट रोजी या अहवालास मान्यता देऊन नवीन तलाठी सजे आणि मंडलांची प्रारुप अधिसूचना जाहीर करुन त्यावर हरकती व सूचना मागविणे अपेक्षित आहे. ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम अधिसूचना प्रसिध्द होणार आहे.
सहा तलाठी सजामागे एक मंडल कार्यालय असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापनेचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर १५ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील. त्यानंतर पुढीलवर्षी १५ फेब्रुवारीला मंडल कार्यालयांची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.