जिल्ह्यात एका दिवसात विक्रमी कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:37+5:302021-07-05T04:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर समन्याय पद्धतीने वाटप केले जात आहे. शनिवारी एका दिवसात जिल्ह्यात २६२ लसीकरण सत्रामधून तब्बल ४२३१८ लोकांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा एक विक्रम ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाखांवर नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरु झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात ही सुविधा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाखांवर नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. शनिवारी तर तब्बल ४२ हजारांवर नागरिकांना लस देण्यात आली. हा एका दिवसातील आतापर्यंतचा विक्रम ठरला. यापूर्वी एका दिवसात ३८ हजार नागरिकांना कोरीना लस दिली होती.
शनिवारी लस घेतलेल्यामध्ये आरोग्य कर्मचारी ९२, आघाडीचे कर्मचारी २६४,१८ ते ४४ वयोगटातील २० हजार ६९७, ४५ ते ६० वयोगटातील १२२६१ आणि ६० वर्षाच्या पुढील ९००४ नागरिकांचा समावेश होता. लस उपलब्ध होत आहे त्या पद्धतीने वाटप केले जात आहे. यासाठी आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी काटेकोर नियोजन करीत आहेत. तसेच लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.
लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावर देखील विविध पातळ्यांवर भर दिला जात आहे. जवळपास सर्वत्र लसीकरणाला योग्य प्रतिसाद मिळत आहे. पण, ज्या ठिकाणी कमी प्रतिसाद आहे. तेथे घरोघरी प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी व अधिकारी यासाठी कष्ट घेत आहेत.
कोट :
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. यासाठी आरोग्य विभाग तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नातून मोहीम यशस्वी ठरत आहे. शनिवारी एका दिवसात ४२ हजार नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंतचा हा विक्रम ठरला आहे. यापुढेही नागरिकांनी असाच प्रतिसाद लसीकरणाला द्यावा. तसेच सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा सातत्याने अवलंब करावा.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
.........................................................................