गुन्हेगारांचं रेकॉर्ड होतंय ‘अपडेट’!
By Admin | Published: September 13, 2015 09:01 PM2015-09-13T21:01:15+5:302015-09-13T22:15:38+5:30
‘कनेक्शन’वर पोलिसांचा ‘वॉच’ : क्रियाशील गुन्हेगारांची माहिती होतेय संकलित; दैनंदिन हालचाली, आर्थिक व्यवहार, संपर्कावरही पोलिसांची नजर
कऱ्हाड : शहरातील गुन्हेगारी कारवाया पोलिसांना तशा नवीन नाहीत. दररोज किमान एक तरी भानगड पोलीस ठाण्याच्या दरवाजापर्यंत पोहोचते. स्टेशन डायरीत त्याची नोंदही होते. त्यामुळे डायरीतील वाढत्या ‘सीआर’चं टेन्शन पोलिसांनी कधीच घेतलं नाही; पण दोन महिन्यांपूर्वी टोळी युद्धाचा भडका उडाल्यानंतर पोलीसही चांगलेच हादरले. वरचढ होऊ पाहत असलेली गुन्हेगारी ठेचून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले. त्यासाठी पोलिसांना ‘अॅक्शन प्लॅन’ही करावा लागला. सध्या या प्लॅननुसार संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे खोदण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी गुन्हेगारांचे रेकॉर्ड ‘अपडेट’ करण्यावर भर दिला जातोय.कऱ्हाडात २० जुलै रोजी बबलू मानेचा खून झाला. त्यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोर बाबर खानला दगडाने ठेचून ठार मारले. या घटनेनंतर शहरात संघटित गुन्हेगारीचे बस्तान बसत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष कऱ्हाडवर केंद्रित झाले. येथील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याबरोबरच बेकायदेशीर शस्त्रे हस्तगत करून गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू झाला. वास्तविक, कऱ्हाड अनेक वर्षांपासून गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. येथील गुन्हेगारी कारवाया आजपर्यंत कधीही थांबलेल्या नाहीत. बळावत चाललेल्या गुन्हेगारीच्या जखमेवर पोलिसांनी त्या-त्या वेळी जालीम उपचार करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. पोलिसांनी फक्त तात्पुरती मलमपट्टी केली. त्यातून हे दुखणे बरे होईल, असा पोलिसांचा समज होता. मात्र, पोलिसांच्या तात्पुरत्या मलमपट्टीला गुन्हेगारांनी जुमानले नाही. त्यामुळेच येथे गुन्हेगारांच्या टोळ्या उदयास आल्या. या टोळ्यांमध्ये वारंवार खटके उडाले. त्याकडेही पोलिसांनी म्हणावे तेवढ्या गांभीर्याने पाहिले नाही. अखेर दुहेरी खुनानंतर कऱ्हाडवर ‘संघटित गुन्हेगारीचे केंद्र’ हा शिक्का बसला.जिल्हा पोलीस दलाने सध्या कऱ्हाड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. येथील गुन्हेगारी क्षेत्रातील किरकोळ घडामोडींवरही पोलीस ‘वॉच’ ठेवून आहेत. सातारची जिल्हा विशेष शाखाही इतर शहरांपेक्षा कऱ्हाडवर लक्ष ठेवून आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा सध्या पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळी शहरात टोळीयुद्धाची घटना घडली, त्यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ राबविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यासह आसपासच्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार पोलीस अधिकारी गुन्हेगारीला चाप लावण्याच्या प्रयत्नात आहेत. गत दोन महिन्यांपासून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचाली तपासण्यास सुरुवात केली आहे. या गुन्हेगारांचे रेकॉर्ड ‘अपडेट’ करण्यावरही भर देण्यात आला आहे. संबंधित गुन्हेगार सध्या इतर गुन्हेगारांशी संपर्कात आहे का? गुन्हेगारी कारवायांच्या अनुषंगाने त्याच्या हालचाली सुरू आहेत का, याबरोबरच सध्याचा त्याचा ठावठिकाणा व कौटुंबिक माहितीही पोलीस संकलित करीत आहेत. (प्रतिनिधी)
सहा वर्षांत ३४ रिव्हॉल्व्हर हस्तगत
कऱ्हाडात रिव्हॉल्व्हर व गावठी कट्ट्यशी संबंधित अनेक गुन्हे यापूर्वी उघडकीस आले आहेत. गत सहा वर्षांमध्ये उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तब्बल ३४ रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टे हस्तगत केले आहेत. २००९ मध्ये ११, २०१० मध्ये ५, २०११ मध्ये ३, २०१२ मध्ये २, २०१३ मध्ये ५, २०१४ मध्ये ४ तर २०१५ मध्ये ३ रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच तलवार, सुरा, चाकू, गुप्ती, कोयता अशी घातक शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
शस्त्राशी संबंधित गुन्हे...
सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझनकडून पोलिसांनी तब्बल पाच रिव्हॉल्व्हर हस्तगत केली.
गावठी कट्ट्याच्या तस्करीप्रकरणी विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्याकडून काही गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले.
संजय पाटील खून व सल्या चेप्या हल्ला प्रकरणातही अनेक रिव्हॉल्व्हर हस्तगत झाले होते.
काही दिवसांपूर्वी सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाघेरीतील एका युवकाकडून गावठी कट्टा हस्तगत केला.
भानुदास धोत्रे टोळीकडूनही गत आठवड्यात तलवार, सुरा, गुप्ती अशी घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली.
खबरीलाल
लागले कामाला...
गुन्हेगारात वावर असणारे आणि पोलिसांचे खबरे म्हणून काम करणारे काहीजण सध्या पोलिसांसाठी महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. या खबऱ्यांकडून पोलिसांना गुन्हेगारांच्या हालचालीची संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. तसेच त्यांची इतर कनेक्शन व आर्थिक व्यवहारही पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत.
कऱ्हाडातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा पोलिसांनी उचलला आहे. त्यादृष्टीने सध्या काही थेट कारवाई व काही गोपनीय हालचाली सुरू आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या आमच्या नजरेखाली आहेत. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही गुन्हेगाराला गुन्हेगारी कृत्य करण्यास आम्ही संधी देणार नाही. रेकॉर्ड ‘अपडेट’ असेल तर आम्हाला त्या गुन्हेगाराची संपूर्ण माहिती लगेच उपलब्ध होते. त्यामुळे सध्या त्यावर आम्ही जास्त भर दिला आहे.
- बी. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कऱ्हाड