गंभीर गुन्ह्याची नोंद, महिलेसह तिघे दोन वर्षे जिल्ह्यातून हद्दपार
By दत्ता यादव | Updated: February 20, 2024 22:16 IST2024-02-20T22:15:57+5:302024-02-20T22:16:24+5:30
सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

गंभीर गुन्ह्याची नोंद, महिलेसह तिघे दोन वर्षे जिल्ह्यातून हद्दपार
दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे.
शकिला गुलाब मुलाणी (वय ६०), अमीर गुलाब मुलाणी (वय ३७), समीर गुलाब मुलाणी (वय ३३, रा. टिटवेवाडी, देशमुखनगर, ता. सातारा), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांवर दुखापत करून शिवीगाळ, दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैध दारूची विक्री करणे, बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी, हाणामारी यासह विविध गुन्हे त्यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांना अनेकदा अटकही झाली. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. या टोळक्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती. या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांनी या टोळीला हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव पाेलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. यावर सुनावणी झाल्यानंतर वरील तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, दादा स्वामी, प्रशांत चव्हाण, विशाल जाधव यांनी योग्य पुरावे सादर केले.