Satara: कोयनेतून सिंचनासाठी विक्रमी पाण्याचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:58 AM2024-06-01T11:58:36+5:302024-06-01T11:58:58+5:30

पावसाने ओढ दिल्याने स्थिती : यंदा पंधरा टीएमसीने धरणाच्या पाणीसाठ्याची तूट निर्माण

Record use of water for irrigation from Koyna dam | Satara: कोयनेतून सिंचनासाठी विक्रमी पाण्याचा वापर!

Satara: कोयनेतून सिंचनासाठी विक्रमी पाण्याचा वापर!

कोयनानगर : कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. धरणाच्या उभारणीपासून हा विक्रमी विसर्ग असू शकतो. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे असून, १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या कोयना धरणामध्ये चालू जलवर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, यामुळे सुमारे पंधरा टीएमसीने धरणाच्या पाणीसाठ्याची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच पाणीकपातीची टांगती तलवारीची चर्चा होती.

सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार शेती पिण्याच्या पाणीसाठी धरणाच्या पूर्वेकडे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाण्याचा विसर्ग सुरू झाला, तो अपवाद वगळता आजवर कायम सुरू आहे. याचाच परिणाम की काय पाणी वापराची अधिक मर्यादा वीजनिर्मितीवर दिसून आली. सुरुवातीला काटकसरीने व नंतर गरजेप्रमाणे कोयना जलविद्युत प्रकल्पाने वीजनिर्मिती सुरू ठेवली असली तरी तुलनेने कमी वीजनिर्मिती झाल्याने तांत्रिक वर्षातील वीज उत्पन्न ही घटवणारी आहे. 

मागील दोन वर्षे लवादाच्या निर्धारित ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापेक्षा अनुक्रमे ८२ व ७१ टीएमसी असा अतिरिक्त पाण्याचा वापर करून कोयना प्रकल्पाने संकटकाळी वीजनिर्मिती करून मोठा हातभार लावला होता. तांत्रिक वर्षाचे काही तास शिल्लक असताना पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे लवादाने आरक्षित केलेली ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याचा पूर्ण वापर होण्याची शक्यता मावळली आहे. 

राज्यातील इतर वीजनिर्मिती प्रकल्पांपेक्षा जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती कमी खर्चात होत असली तरी चालूवर्षी वीजनिर्मितीस बगल देत पूर्वेकडील भागाला विक्रमी ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग केल्याने सिंचनासाठी प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी पाहता भविष्यातही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.


सिंचन विभागकडून सुरुवातीपासून पाण्याचा काटकसरीने वापराचा आदेश होता, तसेच वीजनिर्मितीचा ८.५० टीएमसी पाण्याचा कोटा कमी केल्याने आरक्षित पाणीसाठा वापरला जाणार नाही. तरीही ऐन उन्हाळ्यात मागणीप्रमाणे पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. -एस. जी. चोपडे, मुख्य अभियंता, महाजनको, पोफळी

मागील चौदा वर्षांत सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

सन २००९-१० पाण्याचा विसर्ग -१७.३९ टीएमसी

२०१०-११ - १४.४० टीएमसी
२०११-१२ - २१.४२ टीएमसी
२०१२-१३ - २८.४२ टीएमसी
२०१३-१४- २२.९६ टीएमसी
२०१४-१५ - २१.९५ टीएमसी
२०१५-१६ - ३७.२४ टीएमसी
२०१६-१७ - ३५.७२ टीएमसी
२०१७-१८ - २९.८९ टीएमसी
२०१८-१९ - ३९.३७ टीएमसी
२०१९-२० - २६.८२ टीएमसी
२०२०-२१ - ३५.१५ टीएमसी
२०२१-२२ - २२.९१ टीएमसी
२०२२-२३ - ४०.७६ टीएमसी
दि ३१ मे रोजी सकाळी ४५.१९ टीएमसी

Web Title: Record use of water for irrigation from Koyna dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.