मार्डीत जलमित्रांनी केला विक्रम; दहा हजार लोकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:26 PM2019-05-05T23:26:40+5:302019-05-05T23:26:48+5:30
दहिवडी : पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेले वॉटर कप स्पर्धेत अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. गावोगावी श्रमदान करणाऱ्या ...
दहिवडी : पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेले वॉटर कप स्पर्धेत अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. गावोगावी श्रमदान करणाऱ्या लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी नवनवीन कल्पना राबविल्या जात आहेत. त्यातच माण तालुक्यातील मार्डीकरांनी आयोजित केलेल्या महाश्रमदानास तब्बल १० हजार लोकांनी सहभाग नोंदवून तीन हजार मीटरपेक्षा जास्त काम केले.
वॉटर कप स्पर्धेत रोज नवनवीन संकल्पना राबवत असताना महाश्रमदानाचा उच्चांक करण्याचा बहुमान मार्डी गावाने मिळवला. या अगोदर एका दिवशी बिदालात ५ हजार ८६० तर कुकुडवाड गावाने ८ हजार २०० लोकांचे श्रमदान केले होते. रविवारी मार्डी गावाने ते सर्व विक्रम मोडीत काढून तब्बल १० हजार लोकांच्या उपस्थितीत श्रमदान करून ३००० पेक्षा जास्त घनमीटर काम एकाच दिवसात करण्याचा विक्रम केला.
मार्डी गावाने सुसज्य असे नियोजन करून पत्र व्यवहार करून महाश्रमदानाला अनेकांना निमंत्रित केले होते. यावेळी अभिनेत्री पूजा सावंत, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, वाघोजीराव पोळ, सभापती रमेश पाटोळे, अर्जुन काळे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, युवराज सूर्यवंशी, अतिरिक्त आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, विकास पाटील, प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका निबंधक विजया बाबर, मोटार वाहतूक निरीक्षक गजानन ठोंबरे, दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, एसटी कर्मचारी, शाळा, कॉलेज, सिद्धनाथ उद्योग समूह, माण तालुका डॉक्टर संघटना, मेडिकल असोसिएशन, बिदाल, किरकसाल ग्रामस्थ, माजी शिक्षक संघटना, अंगणवाडी, कृषी सहायक ग्रामसेवक, पाणी फाउंडेशनचे रवींद्र्र पोमणे, तालुका समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार डॉ. संदीप पोळ मित्र परिवार आर्ट आॅफ लिव्हिंग्ज भारतीय जैन संघटनेचे भरतेश गांधी आदी मान्यवरांनी श्रमदान केले.
गेली दोन वर्षे माण तालुक्यात जलसंधारणाचे तब्बल ४०० कोटी रुपयांचे मोठे काम झाले असून, सातत्याने माण तालुक्याने वॉटर कप जिंकला आहे. चालू वर्षीही माण तालुक्यातच वॉटर कप राहील, असा विश्वास आजच्या महाश्रमदानात व्यक्त केला. अनेक गावांत महाश्रमदान होत असते. मात्र बिदालनंतर सुसज्य नियोजन मार्डीमध्ये झाल्याने अगोदरच कामाची आखणी झाली होती.
एक किमीपर्यंत श्रमकऱ्यांचीच गर्दी
या श्रमदानात समस्त ग्रामस्थ उपस्थित राहिले होते. यामध्ये आबालवृद्धांसह राजकीय नेते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिल्याने तब्बल एक किलोमीटर परिसरात खोरी, टिकाव आणि फावडी प्रत्येकाच्या हातामध्ये दिसत होती.