वसुली आघाडी सरकारकडून खिसे भरण्याचे काम : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:16+5:302021-07-07T04:49:16+5:30

दहिवडी : ‘आपली मंत्रिपदाची खुर्ची कधीही जाईल या भीतीने वसुली आघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. तर ...

Recovery front government to fill pockets: Jayakumar Gore | वसुली आघाडी सरकारकडून खिसे भरण्याचे काम : जयकुमार गोरे

वसुली आघाडी सरकारकडून खिसे भरण्याचे काम : जयकुमार गोरे

googlenewsNext

दहिवडी : ‘आपली मंत्रिपदाची खुर्ची कधीही जाईल या भीतीने वसुली आघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. तर शेतकरी, मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठीच अधिवेशन गुंडाळण्याचा कारनामा या सरकारने केला आहे,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

मुंबई येथे विधानभवन परिसरात आघाडी शासनाच्या विरोधात भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने आयोजित अभिरुप विधानसभा सभागृहात ते बोलत होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘आघाडी शासनाने सगळे नियम धाब्यावर बसवून अधिवेशनात जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलण्यास विरोधी पक्षांना बंदी घातली आहे. पावसाळी अधिवेशन कशा प्रकारे गुंडाळता येईल, मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्न कसे प्रलंबित रहातील, विरोधी पक्षाची कशी अडवणूक करता येईल हे सर्व ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या अगोदर पाच तास कॅबिनेटची बैठक घ्यावी लागली. सभागृह सुरु होताच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अंगलट येताच मंत्रिपदासाठी ओबीसी समाजाचा उपयोग करून घेणाऱ्या छगन भुजबळ यांची ढाल करून सरकारने पळवाट शोधली. भुजबळांनीही सरकारचा चेहरा वाचवायचे काम केले आहे.

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करायचे सोडाच उलट शेतीपंपांचे वीजजोड तोडण्याचे काम केले. आता तर गावेच्या गावे अंधारात असून गावांचा पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. या सरकारला अजिबात दयामाया नाही. निर्ढावलेले आघाडी सरकार सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्यसरकार जबाबदारी झटकत आहे.

भास्कर जाधव यांनी सभागृहात न घडलेल्या खोट्या गोष्टी सांगून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करुन अध्यक्षपदाच्या खुर्चीचा अपमान केला आहे. प्रत्येक मंत्र्याला आपली खुर्ची कधीही जाईल याची भीती वाटत आहे. खुर्चीत असेपर्यंत प्रत्येकजण स्वतःचा खिसा भरायचे काम करत आहे. राज्य चालविण्याची क्षमताच या सरकारमध्ये नाही, असा टोलाही आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.

Web Title: Recovery front government to fill pockets: Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.