रयत शिक्षण संस्थेत नोकरभरती घोटाळा; दोन माजी सचिवांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:21 AM2020-12-18T03:21:02+5:302020-12-18T03:21:15+5:30
शरद पवारांनी घेतली तातडीने बैठक
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा झाला आहे. याबाबत तक्रारी झाल्यानंतर संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. याबाबत राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली होती.
रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशा तक्रारी यापूर्वीही अनेकदा झाल्या आहेत. मात्र, कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत असा दावा या संस्थेचे पदाधिकारी करत होते. पैसे दिले नाहीत म्हणून अनेकांना पंधरा वर्ष नोकरीत कायम करण्यात आले नव्हते. मात्र, ज्यांनी पैसे दिले, त्यांची ताबडतोब ऑर्डर काढण्यात आली. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक जणांना केवळ तासिका तत्त्वावर काम करावे लागत होते, अशा तक्रारी आहेत. संस्थेमध्ये सचिव पदावर काम केलेले भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांच्याबाबतही तक्रारी झाल्या होत्या. याबाबतची चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात तातडीने मॅनेजिंग कौन्सिलची बैठक घेतली.
पैसे तातडीने परत करण्याच्या सूचना
चुकीच्या पद्धतीने नोकर भरती करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत दिला.
ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले, त्या सर्वांना पैसे परत देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. तक्रारींचे निरसण होईपर्यंत संस्थेकडून कराळे व बुरुंगले यांना कोणतेही देणे दिले जाऊ नये, असेही ठरल्याचे समजते.