लाल दिवा जानकरांचा... टर्निंग पॉइंट राजकारणाचा

By admin | Published: July 8, 2016 11:12 PM2016-07-08T23:12:39+5:302016-07-09T00:56:25+5:30

माणचा मचळा : आगामी निवडणुकांत तालुका देणार काट्याची टक्कर

The red diva knows ... Turning Point Politics | लाल दिवा जानकरांचा... टर्निंग पॉइंट राजकारणाचा

लाल दिवा जानकरांचा... टर्निंग पॉइंट राजकारणाचा

Next

सागर गुजर -- सातारा
‘मास लिडर’ म्हणून सर्वश्रूत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन भाजपने बेरजेचे राजकारण केले. उशिरा का होईना; पण हुलकावणी देणारी मंत्रिपदाची माळ जानकरांच्या गळ्यात एकदाची पडली अन् माण-खटाव-फलटण या दुष्काळी तालुक्यांसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण तयार झाले. मात्र, जानकरांची ही निवड राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांच्या स्थानिक राजकारणाला ‘टर्निंग पॉइंट’ देणारी ठरणार, हे मात्र नक्की.
पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात कमळ फुलले. हे कमळ फुलविण्यात ‘रासप’चे महादेव जानकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत अन् आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय विधी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे मोठे योगदान ठरले. या नेत्यांचा वापर करून राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने दोन वर्षे राज्याची सत्ता भोगल्यानंतर या चारही नेत्यांची महत्त्वकांक्षा अखेर फलद्रूप केली. कोल्हापूर, पुणे व सांगलीच्या तुलनेत साताऱ्यातील भाजपचे अस्तित्व नगण्य आहे. केंद्र व राज्यात सत्ता येऊन देखील हा पक्ष जिल्ह्यात राजकीय प्रभाव टाकू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मित्र पक्षांना बळ देण्याचे धोरण भाजपचे आहे.
आता जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका, पाच नवनिर्मित नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती असा भरगच्च निवडणूक कार्यक्रम एका मागून एक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांना खूश करून राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन प्रमुख सत्ताधारी पक्षांना शह देण्याची व्यूव्हरचना भाजपची आहे.
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर माण-खटाव विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांच्या निधनानंतर माण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष कोमेजून गेला आहे. पोळ तात्यांच्या गटाला बळकटी देऊन पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समित्या, दहिवडी नगरपंचायतीत घड्याळाचा गजर करण्याचे मनोधैर्य रामराजेंनी एकवटले आहे.
राष्ट्रवादी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीची फौज यासाठी कामाला लागलेली आहे. पोळ तात्यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य सुभाष नरळे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्णी लावून माणमध्ये राष्ट्रवादीचा लालदिवा भिरभिरत ठेवण्यासाठी रामराजेच आग्रही आहेत. काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय धोरण ‘कैद’ करून त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी रामराजे आग्रही राहणार आहेत. आमदार जयकुमार गोरेंना धक्का देण्याची राजकीय आखणी राष्ट्रवादीने केली असतानाच यात माणच्या पटलावर मंत्री महादेव जानकर यांच्या रूपाने नव्या लालदिव्याचे आगमन झाले आहे. या लालदिव्याने जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे यांचे बळ वाढण्यास मदत झाली आहे. हे नवे संकट जयकुमारांपुढे आहे. तसेच एका बंधूला शह देण्याची व्यूव्हरचना आखताना दुसऱ्याच बंधूचे आव्हान राष्ट्रवादीपुढे उभे राहणार आहे.
१९९५ च्या निवडणुकीत खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविणारे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्यापुढेही आता अनेक आव्हाने उभी राहणार आहेत.


दुष्काळी प्रदेशात लाल दिव्यांची भिरकिट!
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, कॅबिनेट मंत्री महादेव जानकर व नियोजित जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांना लाल दिव्याची वाहने मिळणार असल्याने लाल दिव्याची तीन वाहने दुष्काळी माण-खटाव-फलटणमध्ये भिरभिरणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याच्या स्फोटक राजकारणाचे केंद्र हे माण-खटाव ठरणार, यात शंका राहिलेली नाही.

Web Title: The red diva knows ... Turning Point Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.