नदीकाठी लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर : झाडांची सर्रास कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:07 AM2018-05-26T00:07:41+5:302018-05-26T00:07:41+5:30
दीपक पवार ।
तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या बेकायदा उत्खननावरही महसुल विभागाचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे.
पर्यावरणाचा समतोल राहावा, ºहास होऊ नये, यासाठी शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत आहे. ‘एक मूल, एक झाड’ असेही समीकरण शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गावोगावी शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत, वनविभाग यांच्या माध्यमातून झाडे लावली जात आहेत. मात्र, कोयना नदीकाठे लाल मातीसाठी झाडे मुळासकट उपटून टाकली जात आहेत. याकडे महसूल विभाग, वन विभागाने लक्ष दिले पाहिजे; पण असे न होता माती उपसा करणाºया ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार येथे होताना दिसत आहे. ठेकेदार जेसीबीने झाडे पाडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल सध्या ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
म्होप्रे, साकुर्डी, वसंतगड, तांबवे, सुपने, केसे, वारूंजी आदी गावातील कोयना नदीच्या काठावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. तसेच लाल मातीचे प्रमाणही जास्त आहे. यापैकी काही ठिकाणी माती उपशास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात परवान्यापेक्षा कित्तेक पट जास्त माती उत्खनन याठिकाणी होत आहे. माती उत्खननाबरोबरच जी झाडे माती उपसा करताना अडचण ठरत आहेत, ती झाडे कोणाच्याही परवानगीशिवाय हटवली जात आहेत. हे करताना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे धोरण अवलंबले जात आहे. एकूणच माती उत्खननात सर्व काही अलबेल असल्याचे दिसून येत आहे.
नदीच्या काठावर झाडामुळे मातीचे संचयन होऊन सुपीक जमीन तयार होते. तसेच नदीचा काठ सुरक्षित राहतो. पक्ष्यांना आश्रयस्थान मिळते. मात्र, तीच झाडे तोडली जात असल्याने नदीचे काठ तुटणार असून, पात्र मोठे होणार आहे. पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होणार आहे. नदीपासून केवळ ५० मीटर अंतरावर हे उत्खनन सुरू आहे. मातीचे ठेकेदार हा उद्योग करीत आहेत. येत्या पावसाळ्यात याचे गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
तोडलेल्या झाडांची परस्पर विल्हेवाट
साकुर्डी येथे सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने अनेक झाडे मुळासकट उपटली आहेत. तर काही झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली आहेत. या वृक्षांचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. झाडे तोडण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न आहे.