कोरोना लॉकडाऊननंतर प्रवासी सेवेत लालपरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:39+5:302021-06-19T04:25:39+5:30
नवनाथ जगदाळे दहिवडी : कोरोनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर दहिवडी आगारातून मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, पंढरपूर, इचलकरंजी मार्गावर ...
नवनाथ जगदाळे
दहिवडी : कोरोनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर दहिवडी आगारातून मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, पंढरपूर, इचलकरंजी मार्गावर लांबपल्ला व मध्यम लांबपल्ला तसेच दहिवडी-सातारा व दहिवडी-कऱ्हाड मार्गावर लालपरीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रवासी वाहतूक चालू करण्यात आलेली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या दहिवडी आगारामार्फत मुंबई, नाशिक व पुणे येथे जाणेकरिता दहिवडी व म्हसवड भागातील प्रवाशांना बससेवेचा लाभ घेता यावा म्हणून म्हसवड येथून मुंबई, नाशिक व पुणे इत्यादी मार्गावर प्रवाशी सेवा चालविण्यात येत आहे. मार्गावर देण्यात येणाऱ्या सर्व बसेस या आतून बाहेरून स्वच्छ धुऊन, योग्यरीत्या सॅनिटाझर करून तसेच कर्तव्यावरील चालक वाहक यांना कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केलेली आहे.
दहिवडी आगारातून दहिवडी-म्हसवड-परेल ही गाडी रात्री साडेपाचला तर परेल-म्हसवड साडेआठला सुटते. दहिवडी बुधमार्गे मुंबई ही सकाळी साडेनऊला तर तर मुंबई-बुधमार्ग दहिवडी साडेसहाला. दहिवडी-मेगा हायवे सातारामार्गे मुंबई सकाळी सव्वानऊ वाजता तर मुंबई-मेगा हायवे सातारामार्गे दहिवडी साडेसातला हालते. दहिवडी-म्हसवड-नाशिक पावणेनऊला तर नाशिक म्हसवड-दहिवडी सकाळी साडेसहा वाजता जाते. गोंदवले-परेल ही गाडी सकाळी पावणेआठ, दहिवडी-इचरकरंजी सकाळी सात वाजता, दहिवडी-कोल्हापूर ही गाडी सकाळी सव्वासात वाजता तर दहिवडी-कोल्हापूर पावणे नऊला
जाते. दहिवडी-चिंचवड दुपारी पावणे एक वाजता तर दहिवडी-पंढरपूर दुपारी दीड वाजता सुटते. दहिवडी-सातारा मार्गावर या आगाराकडून दर दोन तासांनी शटल फेऱ्या चालविण्यात येत आहेत. दहिवडी-कऱ्हाड मार्गावर त्याच पद्धतीने प्रवाशी गर्दीनुसार फेऱ्या चालविण्यात येत आहेत.
माल वाहतूकही फायद्याची
राज्य परिवहन महामंडळाने महाकार्गो नावाने माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. दहिवडी परिसरातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार, वर्गाने सदर मालवाहतूक सेवेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीकरिता आगाराशी संपर्क करावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक विक्रम देशमुख यांनी केले आहे.