Satara: मुलीच्या पित्याने साखरपुड्याला सहा लाखांचा खर्च केला, अन् 'असं' कारण देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला
By नितीन काळेल | Published: August 17, 2023 06:56 PM2023-08-17T18:56:56+5:302023-08-17T18:57:17+5:30
मुलासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद
सातारा : सर्वाच्या सहमतीने लग्न ठरवून नंतर साखरपुडाही झाला. तसेच लग्नाची तारीखही ठरविण्यात आली. यादरम्यान, मुलीच्या पित्याचा ५ लाख ९० हजारांचा खर्च झाला. मात्र, साखरपुड्यानंतर १५ दिवसांनी मुला-मुलीचे विचार जुळत नसल्याचे कारण देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलासह चाैघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना सातारा शहरात घडली आहे. यातील तक्रारदार आणि गुन्हा नोंद असणारे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तक्रारदाराच्या मुलीचा विवाह सर्व सहमतीने ठरला होता. त्यामुळे रितीरिवाजाप्रमाणे सुपारी आणि साखरपुड्याचा कार्यक्रमही झाला. यासाठी मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी कपडे, इतर साहित्यासाठी ५ लाख ९० हजार रुपयांचा खर्च केला. तर लग्नाची तारीख ठरविण्यात आली.
मात्र, साखरपुड्यानंतर १५ ते २० दिवसांनी मुलाकडील लोकांनी मुलगा आणि मुलीचे विचार जुळत नसल्याचे सांगत लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मुलासह त्याचे वडील, आई आणि बहीण अशा चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. सातारा शहर पोलिस अधिक माहिती घेत आहेत.