मराठा समाज आरक्षणाबाबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:32+5:302021-06-02T04:28:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले. हलगर्जीपणा केल्यानेच मराठा ...

Regarding Maratha community reservation | मराठा समाज आरक्षणाबाबत

मराठा समाज आरक्षणाबाबत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले. हलगर्जीपणा केल्यानेच मराठा समाजावर घोर अन्याय झाला आहे,’ असा घणाघाती आरोप भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला तसेच यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी आरक्षणाचा लढा देण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहनही केले.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘२०१८ मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले तसेच हे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले. पण, याविरोधात काही संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला धक्का बसला आहे. खऱ्या अर्थाने राज्य शासनच सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले आहे. केंद्राच्या अ‍ॅटर्नी जनरलनींही आरक्षणाला पाठिंबा म्हणून सांगितले होते. यावरून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनच गंभीर नव्हते. हलगर्जीपणा केल्यानेच समाजावर घोर अन्याय झालेला आहे.

मराठा समाजाने मागील ६० ते ७० वर्षांत मोठ्या भावाची भूमिका घेऊन इतर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घेतला, असे सांगून माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले, देशातील ७ राज्यांत ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण आहे. महाराष्ट्रातच ते रद्द झाले आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर बाबींची माहिती घेणार आहोत तसेच मराठा समाजाच्या या लढ्यात खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच सर्व पक्ष आणि संघटनांनीही एकत्र यावे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर बैठका होतील व पुन्हा कायदेशीर लढाई सुरू होईल.

मराठा समाजातील तरुणांच्या भविष्य आणि रोजीरोटीचा प्रश्न आहे. ही मुलं भडकतील तरीही हिंसक मार्ग न स्वीकारता शांतपणे व नियोजन पद्धतीने आरक्षणाचा लढा सुरू ठेवू, असेही माजी मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

चौकट :

उदयनराजे पुढाकार घेण्यास तयार...

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी भूमिका काय भूमिका घेतली, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर माजी मंत्री पाटील यांनी मराठा समाजावर आरक्षणाबाबत अन्याय झाला हे खरे आहे. आपण एकत्र बसू. तसेच याबाबत पुढाकार घेऊ, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे, असे सांगितले.

.............................................................

Web Title: Regarding Maratha community reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.