बांधकाम कामगारांनो नोंदणी करा, कुटुंबाला मिळेल 'इतक्या' लाखाचे आर्थिक संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:52 PM2021-11-27T13:52:31+5:302021-11-27T13:54:15+5:30
कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर कामगाराच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ५ लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना हे ठाऊकच नाही.
सागर गुजर
सातारा : बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ शासनाने तयार केले आहे. जिल्ह्यातील १० हजार कामगारांनी यासाठी नोंदणी केली आहे. कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर कामगाराच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ५ लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना हे ठाऊकच नाही.
बांधकाम क्षेत्र हे असंघटित कामगारांचे क्षेत्र असून त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते. अनेक कामगार या क्षेत्रात काम करत असले तरी बरेच जण नोंदणी करत नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. आर्थिक सहाय्य योजना ही अत्यंत प्रभावी आणि कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी फलदायी ठरणारी योजना आहे.
१० हजार अर्ज
कामगार आयुक्त कार्यालयाकडे आत्तापर्यंत १० हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. कार्यालयामार्फत जास्तीत जास्त कामगारांनी नाेंदणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख
नोंदित बांधकाम कामगाराचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला ५ लाख आर्थिक सहाय्य दिले जाते. संबंधित कामगाराच्या पत्नीला सलग पाच वर्षे २४ हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते.
तीन वर्षात १० हजार प्रस्ताव
कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या १० हजार कामगारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार त्यांना सुरक्षा दिली जाणार आहे.
योजना आहे, हेच ठाऊक नाही !
नोंदित बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना योजना राबवल्या जातात. कामगारांनी या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांनी तर लवकरात लवकर आपली नोंद कामगार कार्यालयाकडे करावी. - चेतन जगताप, सहायक आयुक्त कामगार कल्याण
कामगारांसाठी कोणत्या योजना आहेत, याची माहितीच नाही. रोज काम करणे आठवड्याला मजुरी मिळवून बाजार करणे यातच आमचं आयुष्य निघून चाललं आहे. आम्हाला ऑनलाईन नोंदणी कशी करायची तेही माहित नाही. - रुपाली गुजर, बांधकाम कामगार
शासकीय योजनांचा लाभ वशिलेबाजी करणारांनाच मिळतो. आमचा वशिला कोण लावणार? आमच्यासाठी कोण वेळ काढणार? आम्हाला रोज काम करुन दिवस काढावा लागतो. कामावर गेलो नाही तर कोण पैसे देणार? - संभाजी खलाटे