शरीर सुखास नकार दिल्याने पत्नीची जाळून हत्या करणाºया पतीला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:31 PM2019-09-21T19:31:48+5:302019-09-21T19:35:15+5:30
जबाबामध्ये तिने पती अनिलने शरीर संबंधास नकार दिल्याने जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनिल बिचकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
सातारा : शरीर संबंधास नकार दिल्याने चिडून जाऊन पत्नीची जाळून हत्या करणारा पती अनिल आनंदराव बिचकर (वय ३५, रा. श्रीनाथ कॉलनी रामकुंड, सदर बझार, सातारा) याला प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, अनिल बिचकर आणि मंजिरी बिचकर (वय ३०) हे दाम्पत्य सदर बझारमध्ये वास्तव्य करत होते. १६ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी मंजिरी ही सत्संग कार्यक्रमावरून घरी आली. यावेळी पती अनिल हा दारूच्या नशेत होता. त्याने पत्नीकडे शरीर संबंधाची मागणी केली. पत्नीने नकार देताच अनिलने चिडून जाऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतले. देवासमोर असलेली पेटती निरंजन तिच्या गाऊनला लावून त्याने पेटवून दिले. यामध्ये मंजिरी ५८ टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. मिरज, जि. सांगली येथील मिशन हॉस्पीटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसानंतर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने मिरज येथील कार्यकारी दंडाधिकाºयांसमोर जबाब दिला होता.
त्या जबाबामध्ये तिने पती अनिलने शरीर संबंधास नकार दिल्याने जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनिल बिचकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक सी.एस. बेदरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने पती अनिल बिचकर याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सहायक जिल्हा सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस नाईक आर. एल. शेख यांनी सहकार्य केले.