नातं कालांतरानं ओझं होतं म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:24+5:302021-07-18T04:27:24+5:30

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त ...

As the relationship becomes a burden over time ... | नातं कालांतरानं ओझं होतं म्हणून...

नातं कालांतरानं ओझं होतं म्हणून...

Next

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त जातात, तेव्हा तेथील लाईफ स्टाईल निश्चितपणे त्यांना आकर्षित करते. घरातील मोठ्यांच्या धाकात वयाच्या एकोणीस-वीस वर्षांपर्यंत आयुष्य कंठलेल्या या मुलांना हे जग नवं असतं. फुलत्या वयात मनाचं फुलपाखरूदेखील फुलांच्या शोधात असतं. ऐन बहरात अशी फुलांची बागच जर समोर दिसली तर हे फुलपाखरू नक्कीच हरखून जातं. मनाच्या बेड्या तुटलेल्या असतात. एक नवं नातं जोडायचा ध्यास मनात रुंजी घालत असतो. हे नातं तयार होतं. कल्पनेच्या विश्वात ते फिट्ट बसतं. अन् मग नैतिकतेच्या बुरख्याला बाजूला करून हे नातं जोडलं जातं.

प्रेमात पडलेल्या दोघांना तितक्यात लग्न करायचं नसतं. मात्र, दोघांना समजून घेत एकत्र राहायचं असतं. सध्याच्या काळात ‘लिव्ह इन’चे प्रमाण वाढलेले आहे. लग्न घरातल्या लोकांशी बोलून पण प्रेम मात्र स्वत:च ठरवून असा क्रांतिकारक विचार मनात डोकावत असतो. तेव्हा मात्र लग्नाशिवाय एकत्र राहण्याचं धाडस केलं जातं. लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणं कितीतरी महत्त्वाचं असतं. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करिअर प्लान्स सगळं समजून घेणं आवश्यक असतं. केवळ ‘आवडला, आवडली’ म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे. ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर घरातील मोठ्यांच्या सांगण्यानुसार लग्नगाठ बांधण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेले आहे, हे मात्र निश्चित..!

प्रॅक्टिकल ॲटिट्यूड महत्त्वाचा..

उच्चशिक्षण घेतल्यानंतर मुलांप्रमाणेच मुलीही करिअरच्या वाटा शोधत असतात. मात्र, वय निघत चाललंय, असं म्हणत घरातले तिचं लग्न उरकण्याच्या तयारीला लागतात. मात्र, तिचा साफ नकार असतो. लग्नानंतर सासरच्या मंडळींना सुनेनं नोकरी करणं पटलं नाही तर पुन्हा भावनिक संघर्षाला सामोरे जावं लागणार, ही भीती तशी योग्यच नाही का? त्यामुळे मुलं-मुली प्रॅक्टिकल ॲटिट्यूड ठेवतात. कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत ठेवण्यासाठी हा विचार महत्त्वाचा ठरतोय.

सागर गुजर

Web Title: As the relationship becomes a burden over time ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.