सोबत्यांच्या वाढदिवसाला तरुणाने जोडले वृक्षांशी नाते...-- ओमकार चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 10:10 PM2019-06-01T22:10:38+5:302019-06-01T22:15:47+5:30
सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी ...
सातारा : सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी गावोगावी जलसंधारण आणि वृक्षारोपणची चळवळ उभी राहिली आहे. त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा, यासाठी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. तळिये येथील एका तरुणाने आपल्या मित्र व नातेवाइकांच्या वाढदिवसाला कोणत्याही स्वरुपाची भेट वस्तू देण्यापेक्षा रोप देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सातारा जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव हे तीन तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरातील गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते.
दुष्काळ आणि पाणी टंचाई आदी प्रश्नांवर मात करण्यासाठी तळिये येथील ओमकार चव्हाण या तरुणाने ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये जलसंधारणच्या कामांना सुरुवात केली. ते करीत असताना केवळ जलसंधारणाची कामे करून चालणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा हवामान शास्त्र समजून घेतलं पाहिजे, यासाठी पर्यावरणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम पर्यावरणावर झाला आहे. त्याचा परिणाम पावसावर होऊन पाऊस कमी झाल्याचे उमगले.
ही समस्या सोडविण्यासाठी त्याने स्वत: वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करत असताना एकट्याला मर्यादा येत असल्याचे पाहून इतरांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले. मात्र, त्यामध्ये सातत्य राहत नसल्याने त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाइकांच्या वाढदिवस तसेच शुभकार्याला भेट वस्तू न देता झाडाचे रोप दिले जाते.
विद्यार्थ्यांकडून सीडबॉल निर्मिती
वृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असावा. प्रत्येक मोहिमेमध्ये शाळकरी मुलांचे मोठे योगदान असते. म्हणून अशा मुलांना सोबत घेऊन ओमकार चव्हाण उन्हाळ्यात स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून सीडबॉल तयार करतात. पावसाळा सुरू झाल्यावर ते गोळे परिसरात टाकले जातात.
पर्यावरण संवर्धनाची गरज
दुष्काळ, पाणी टंचाई आणि हवामान बदल आदी प्रश्नांना तोंड देण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. सध्या वाढलेले तापमान, कमी झालेले पावसाचे प्रमाण आदी वातावरण बदलाची लक्षणे आहेत. आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. तसेच त्याचे संवर्धनही केले पाहिजे.
- ओमकार चव्हाण