कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांचा होतोय ‘एप्रिल फूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:48+5:302021-04-22T04:40:48+5:30
जगदीश कोष्टी लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाबाधित रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांच्या दृष्टीने एक-एक मिनिट महत्त्वाचे असते. अनेकदा बेडच मिळत ...
जगदीश कोष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाबाधित रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांच्या दृष्टीने एक-एक मिनिट महत्त्वाचे असते. अनेकदा बेडच मिळत नाहीत, त्यामुळे ओळखीच्या मंडळींकडे मोठ्या आशेने मदत मागितली जाते. संबंधित व्यक्ती सोशल मीडियावर फिरत असलेली पोस्ट टाकतात, पण या पोस्टमधील संपर्क क्रमांक बनावट असल्याने नातेवाईकांचे ‘एप्रिल फूल’ होत आहे.
खोटं बोलू नये, कोणाला फसवणे चांगले नाही, असे लहानपणी सांगितले जात असले तरी एक एप्रिल रोजी ‘एप्रिल फूल’ साजरा केला जातो. मित्र, नातेवाईकाला यादिवशी फसवले जाते. काही वेळेस तर अग्निशमन दल, पोलीस, रुग्णालय या शासकीय यंत्रणेला दूरध्वनी करुन एप्रिल फूल केला जात होता. दरम्यानच्या काळात गुन्हे दाखल होऊ लागल्यानंतर हे प्रकार बंद झाले. पण कोरोना काळात मात्र अजूनही फसव्या पोस्ट फिरत आहेत. त्यामुळे रुग्ण अन् नातेवाईकांचा मोठा वेळ वाया जात आहे. हे प्रकार प्रामुख्याने पुण्यामध्ये मोठ्या संख्येने घडत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याला दवाखान्यात दाखल करण्याशिवाय पर्यायच नसतो. अशावेळी बेड कोठे उपलब्ध आहे, याचा शोध सुरू होतो. काहीवेळेस ऑक्सिजन बेड, अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते. पण बेड कोठे उपलब्ध आहे, याचा तपास लागत नाही. अशावेळी ओळखीतील प्रतिष्ठित व्यक्तीची मदत घेतली जाते तर काहीवेळेला सोशल मीडियातून फिरत असलेल्या पोस्ट पुन्हा नातेवाईकांना पाठवल्या जातात. पण त्या पाठवत असताना त्या कितपत खऱ्या आहेत, याची खातरजमा केला जात नाही. अशा पोस्टमधील मोबाईल नंबर बंद असतात किंवा तो ‘राँग नंबर’ असतो. त्यामुळे या पोस्टची मदत होण्याऐवजी वेळखाऊ ठरत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट
पोकळ आश्वासनांचा त्रास
आपली शहरात ओळख असल्याच्या बतावण्या मारणारे ग्रामीण भागात मोठ्या संख्येने असतात. गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळला तर अशांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. कोठेतरी मदत मिळेल, अशी अपेक्षाही असते. पण संबंधित चमकोगिरी करणारे उद्या बेड मिळेल, इंजेक्शनबद्दल बोलणे सुरू आहे, अशी पोकळ आश्वासने देत असतात. यात रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ वाया जातो.
शासकीय लिंक फायदेशीर
सातारा जिल्हा प्रशासनाने कोठे बेड उपलब्ध आहेत, याची अचूक माहिती देणारी लिंक तयार केली आहे. तशीच लिंक इतर जिल्ह्यांतही सुरू आहे. या लिंकचा उपयोग केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो.