सातारा: प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाइकांना करावा लागतोय मैलांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:37+5:302021-04-09T04:41:37+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील व्यक्तींसाठी पंढरपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, आदी ठिकाणाहून प्लाझ्मा उपलब्ध करून ...
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील व्यक्तींसाठी पंढरपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, आदी ठिकाणाहून प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मा मिळविण्यासाठी रोज पाचशे-साडेपाचशे किलोमीटरचा प्रवासही करतात. रुग्णांच्या या नातेवाइकांचा त्रास वाचविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी प्लाझ्मा दान चळवळ राबविणे आवश्यक बनले आहे.
कोविड काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. वयस्क व काही दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्यांची शक्ती वाढविण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त ठरते. प्रारंभी जनजागृतीच्या अभावामुळे साताऱ्यात प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या मोजकीच होती. गेल्या काही दिवसांत ही संख्या वाढत असली तरी त्याला अद्यापही मोठ्या प्रमाणात गती मिळणे आवश्यक आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे दुर्धर आजारग्रस्तांना कोविडबरोबरची लढाई लढणे सोपे जाणार आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी सर्वांच्या समोर उभा ठाकलेल्या कोरोना विषाणूचा अभ्यास आता विविध प्रयोगशाळांमधून झाला. या विषाणूशी लढा देण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातील रक्ताच्या प्लाझ्मामधून मिळते. रक्तातील हे प्लाझ्मा दान करण्यासाठी विविध माध्यमातून आवाहन केले जात आहे, मात्र, प्रत्यक्षात त्याला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे पाहायला मिळते. मोठ्या शहरांमध्ये प्लाझ्मा दान अभियान मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहे. पण छोट्या शहरांमध्ये अद्यापही त्याबाबत पुरेशी जागृती पाहायला मिळत नाही.
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
कोरोना विषाणूवर ज्या शरीराने यशस्वी मात केली, त्यांच्यामध्ये कोरोनाशी लढण्याच्या पेशी तयार होतात. रक्तातून निव्वळ या रक्तपेशी काढून कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णाच्या शरीरात सोडल्या जातात. साम्य असणाऱ्या रक्तगटाच्या व्यक्तींना हा प्लाझ्मा दिल्याने ते शरीराचे संरक्षण करतात. कोरोनावर मात केलेल्या १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणीही प्लाझ्मा दान करू शकते. यामुळे शरीराला अशक्तपणा येणे किंवा अन्य कोणतेही नुकसान होत नाही, असे वैद्यकीय सूत्र सांगतात.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या अनुषंगाने काम सुरू आहे. पण कोविडच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे सुमारे दोन महिन्यांपासून मी प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. महानगरे, ते निमशहरे ग्रामीण भागापर्यंत प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही त्याचा आवश्यक तितका साठा रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध नाही, तो वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे साताऱ्यातील कोव्हिड डिफेंडर ग्रुपचे सदस्य गणेश नलावडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दिवसभरात रुग्णांसाठी मागणी : ५०
प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या प्लाझ्माची संख्या : १५
साताऱ्यात प्लाझ्मा येथून आणतात : पुणे, नाशिक, पंढरपूर
सर्वाधिक तुटवडा असलेला प्लाझ्मा रक्तगट : ओ निगेटिव्ह